नवी दिल्ली - शाळा-महाविद्यालयांबाबत अनलॉक-4 मध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालये अद्याप बंदच राहणार आहेत. पण, 21 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वीचे विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यास जाऊ शकतील. त्यासाठी पालकांची लेखी मंजूरी आवश्यक असणार आहे. अनलॉक -4 मध्ये ऑनलाईन व डिस्टन्स शिक्षणास चालना दिली जाणार आहे.
केंद्र सरकारने अनलॉक-4साठी शनिवारी संध्याकाळी नवीन सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये शाळा-महाविद्यालये आणि कोचिंग सेंटरबाबत निर्णय घेतला आहे.
नवीन मार्गदर्शक सुचना
- ऑनलाईन कोचिंग व टेली काउन्सलिंगसाठी शाळांमध्ये 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना बोलावले जाऊ शकते. राज्य सरकार याची परवानगी देऊ शकतात.
- 21 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी स्वतःच्या इच्छेनुसार शाळेत जाऊ शकतील. यासाठी त्यांना पालकांकडून लेखी परवानगी घ्यावी लागेल.
- राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
- राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था, भारतीय उद्योजकता संस्था येथे देखील प्रशिक्षण सुरू केले जाऊ शकते.
- उच्च शिक्षण संस्था केवळ पीएचडी करणार्या संशोधन अभ्यासकांसाठीच उघडतील.
- तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पदव्युत्तर विद्यार्थी ज्यांच्यासाठी प्रयोगशाळेचा वापर किंवा प्रयोग कार्य आवश्यक आहे, ते महाविद्यालयात जाऊ शकतील. राज्यांशी चर्चा झाल्यानंतर उच्च शिक्षण विभाग हे उघडण्यास परवानगी देईल.
केंद्राने केला होता सर्व्हे - केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने जुलैमध्ये पालकांमध्ये एक सर्वेक्षण केले होते. यानुसार सध्या बरेच पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. परंतु काही राज्यांनी म्हटले आहे की दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होत आहे. त्यांच्याकडे ऑनलाईन अभ्यासासाठी लॅपटॉप किंवा इंटरनेट नेटवर्क नसल्याचे समोर आले होते.