प्रियांका चव्हाण (वय २२) व तिचा मामा विठ्ठल निलवर्ण (वय ३८) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. प्रियांका हिने दोन वर्षांपूर्वी आपण सीआयडी इन्स्पेक्टर झाल्याचे सांगून गारगोटी शहरात पोस्टर झळकावले. या माध्यमातून तिने सत्कार करून घेऊन आपली सीआयडी इन्स्पेक्टर अशी इमेजही तयार करून घेतली. तिच्या या भुलथापावरच अनेक लोकांचाही विश्वास बसला.
अन तेथून पुढे फसवणूक नाट्याला सुरुवात झाली. प्रियांकाने अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना हेरून सीआयडी विभागात नोकरी लावतो, असे सांगितले. तिच्या मामाच्या मदतीने तिने अनेकांना 'मामा' बनवले. परंतु नोकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर आपली फसगत झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यापैकीच एकाने खऱ्या पोलिसांकडे धाव घेत या दोघा तोतया पोलिसांचे पितळ उघडे पाडले.