मुंबई - सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांची नुकतीच क्वारंटाईनमधून मुक्तता करण्यात आली. यानंतर विमानतळावरुन पाटण्याला रवाना होत असताना त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. तिवारी म्हणाले, जे झाले ते दुर्दैवी होते. त्यांनी मला नाही, तर सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अपेक्षित असलेल्या चौकशीला क्वारंटाईन केले.
गेल्या आठवड्यात जोगेश्वरी येथील एका गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाइन असलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना शुक्रवारी दुपारी मुक्त केले गेले. त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने त्यांना कोणतेही कारण न देता तेथून जाण्यास सांगितले. तिवारी मुंबई विमानतळावरून पाटण्याकडे रवाना झाले. गेस्ट हाऊसमधून बाहेर पडताना त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी घेराव घातला.
यावेळी बोलताना तिवारी म्हणाले की, त्यांनी मला नव्हे, तर या प्रकरणाच्या चौकशीला क्वारंटाइन केले होते. बिहार पोलिस चौकशी करत होते मात्र त्यांच्या कामात अडथळा आणण्याचे काम केले गेले. आपण ऑन ड्युटी असूनही त्यांनी काहीही कारण न देता आपल्याला क्वारंटाईन केले. यावरुन महाराष्ट्र सरकारने सुशांत प्रकरणाच्या तपासाबद्दल लोकांच्या मनात शंका उपस्थित केल्या आहेत.