अहमदनगर - शहरात गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस इतका जोराचा होता की अवघ्या काही मिनिटांतच शहरात सर्व रस्ते दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे सर्व शहर जलमय झालेले दिसत होते.
अहमदनगर शहरात गेले काही महिने पावसाने दडी मारलेली होती. मान्सूनचे आगमन झाले तेव्हा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावली होती. परंतु पुन्हा काही दिवसांतच पाऊस गायब झाला. गुरुवारी सायंकाळी मात्र त्याने दमदार पुनरागमन केले.
शहरात इतका जोराचा पाऊस झाला की रस्त्यांवर कमरेइतके पाणी साचून वेगाने वाहू लागले. या पावसाच्या पाण्याला इतका वेग होता की लोकांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी गाड्याही पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या.
नगरकरांनी खूप दिवसांनी असा पाऊस पहिला. खरं तर या शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी पाऊस दमदार हजेरी लावत असतो. यंदा मात्र त्यात थोडा उशीर झाला असला तरी, पावसाने आपली कसर भरून काढली.
थोडा ब्रेक घेऊन पुन्हा आलेला पाऊस इतका जोरदार होता की 'हा पाऊस आहे की ढगफुटी झाली आहे ?' असा प्रश्न नगरकरांना पडला. नागरिक घरातून, गच्चीवर येऊन, रस्त्याच्या कडेला उभे राहून पावसाचे वाहून जाणारे पाणी पाहत होते.