अहमदनगर - महिलेचा फोटो अश्लील एडिटिंग करून व्हायरल करणाऱ्या विकृत व्यक्तीला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. निळवंड ता. अकोले येथून या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे ज्याला पोलिसांनी अटक केली तो पीडित महिलेचा पतीच निघाला आहे.
अज्ञात मोबाईल धारकाने अनोळखी व्हाट्सअप ग्रुपला ॲड केले व त्यावर महिलेचा चेहरा लावला. खाली नग्न अवस्थेतील दुसरा फोटो लावलेल्या असा फोटो पाठवून सदर फोटो हा फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. या महिलेच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याची दखल घेऊन तपास केला असता, निळवंडे तालुका अकोले परिसरात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पथकाने पिंपरी परिसरात सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली, असता गुन्हा त्याने कबूल केला आरोपी याने स्वतःच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सिमकार्ड वापरून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.
त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सिम कार्ड हस्तगत करण्यात आले. आरोपी हा दुर्गम भागातील असून तो केवळ दहावी शिक्षण झालेला असताना सुद्धा त्याने अशा प्रकारचा गुन्हा केला, त्याने अशाप्रकारे किती लोकांना त्रास दिला आहे का ? याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला.
सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या सूचनेनुसार फौजदार प्रतीक कोळी, हे. काॅ. योगेश गोसावी, पोलिस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, विशाल अमृते, भगवान कोंडार, महिला पोलिस पूजा भांगरे, चालक वासुदेव शेलार आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.