नागपुर - शहराचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची अवघ्या सात महिन्यांच्या करकीर्दीनंतर लगेचच बदली करण्यात आली आहे. बदली होण्यापूर्वी तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे ते काही दिवस क्वॉरंटन झालेले होते. आता कोरोनावर मात करून त्यांनी पुन्हा सेवेत हजेरी लावली आहे. तुकाराम मुंडे नेमके काय म्हणाले त्यांच्याच तोंडून ऐका..
Goodbye NMC, Thank you Nagpur !
नुकतंच कोव्हिड विषाणूच्या संक्रमाणातून मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्याप्रति असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकविणारा ठरला. कोव्हिड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकाराचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही.
जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला Good bye. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल Thank you...!