पोलिसांना वाटले 'बाळ बोठे' आहे, पण तावडीत सापडला 'हा' डॉक्टर

अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे अजूनही फरारच आहे. बोठेचा खास मित्र असलेल्या एका डॉक्टरला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. या डॉक्टरकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. निलेश शेळके असे या डॉक्टरचे नाव आहे.

फरार आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या शेळके याला शुक्रवारी पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. बोठे याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाच्या हाती हा डॉक्टर लागला.या डॉक्टरवर नगरमधील बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचाही गुन्हा होता. 

रेखा जरेच्या खून प्रकरणात त्याने बोठेला मदत केल्याचा पोलिसांना संशय असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी ताब्यात घेतल्यानंतर त्याला सुपा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. त्याला अटक केलेली नसून फक्त चौकशीकरिता त्याला ताब्यात घेतले होते.

मात्र, सखोल चौकशीनंतर शेळके याच्यावर पुढे काय कारवाई करायची, ते ठरवले जाईल, अशी माहिती नगर ग्रामीण उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !