मुंबई - लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. नवी मुंबईतील वाशीमध्ये मंगळवारी (22 डिसेंबर) 24 वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत रेल्वे ट्रॅकवर पडलेली आढळली.
दोन दिवसानंतर तिला शुद्ध आल्यानंतर गुरुवारी तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या महिलेच्या सांगण्यावरुन बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ययाबाबत पोलिसांनी सांगितले आहे की, महिलेच्या अंगावरील जखमांच्या आधारे आधी हत्येचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुरुवारी बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर 376 (बलात्कार) ची कलम त्यात जोडले आहे. याप्रकरणी एका अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळू, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर आरोपीला अटक करयाची मागणी केली जात आहे.