शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, विकासासाठी २३ कोटीचा निधी

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

मुंबई : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यास आज प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी दिली. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

आदित्य ठाकरे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधीत गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभिकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. यासाठी २३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. या निधीतून शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व जपत त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल, असे ते म्हणाले.

या निधीतून पुरातत्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनुरुज्जीवन, पाथवेंची सुधारणा, रॉककट गुंफांचे पुनुरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे इको टुरीजमची कामे, अप्पर पाथवेसाठी गॅबियन वॉल, बागेसाठी लँडस्केपींगची कामे आदी विविध कामे केली जाणार आहेत.  

या कामासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या कामाच्या मंजुरीसाठी वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पर्यटन मंत्री ठाकरे यांनी आभार मानले आहेत. भविष्यात शिवनेरीप्रमाणेच राज्यातील सर्व गडकिल्ल्यांचा त्यांचे ऐतिहासिक महत्व राखत पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल. या माध्यमातून शिवरायांचे कार्य देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक कार्य केले जाईल, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !