नवी दिल्ली: कोरोना संकटानंतर आज पहिल्यांदाच केंद्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वच देशावासियांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर भरीव तरतूद करण्यात येणार याबरोबरच काय स्वस्त होणार आणि काय महागणार? याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
आजच्या अर्थसंकल्पात गृहिणींना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये घरगुती वस्तू महागण्याची शक्यता आहे. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, क्लॉथ ड्रायर आदी वस्तू महागण्याची शक्यता आहे. त्या शिवाय अनेक गोष्टी महागणार असल्याने सामान्य लोकांना त्याचा फटका बसणार आहे.
गेलं संपूर्ण वर्ष कोरोना संकटात गेलं. त्यामुळे रेल्वे सेवा बंद होती. परिणामी रेल्वेला त्याचा मोठा घाटा बसला आहे. रेल्वेचे अनेक प्रकल्प रखडले असून नव्या प्रकल्पांनाही सुरुवात करायची आहे. परंतु रेल्वेची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने रेल्वे तिकीटात वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी प्रवाशांच्या खिशालाच हात घालण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या वस्तू होणार स्वस्त
यंदाच्या अर्थसंकल्पात फर्निचरचा कच्चा माल. केमिकल, तांबे, दूरसंचाराचे उपकरणे आणि रबराच्या उत्पादनावरील कस्टम ड्युटीत कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय चमड्याचे कपडे, पॉलिश करण्यात आलेल्या हिऱ्यांवरील कस्टम ड्युटीही कमी केली जाऊ शकते. तसेच तांब्याच्या भंगारावरील आयात शुल्कही घटविण्यात येऊ शकतं. त्यामुळे फर्निचर, दूरसंचार उपकरणे आणि रबराची उत्पादने स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत.
केंद्र सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी गेल्या काही वर्षापासून मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे रस्ते अपघात टाळण्यासाठी हेल्मेटवरील जीएसटी कमी करण्यात येऊ शकते. त्यामुळे हेल्मेट स्वस्त होतील आणि त्याच्या खरेदीतही वाढ होईल. परिणामी रस्ते अपघात रोखता येणार आहेत. त्याशिवाय रस्ते अपघात अभियानावर जो पैसा खर्च केला जातो. त्यातही बचत होणार आहे.
इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढावा म्हणून केंद्र सरकार काही नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देण्याची घोषणा होऊ शकते. आजच्या अर्थसंकल्पातून ही बाब स्पष्ट होईल.
हॉटेलिंग स्वस्त होणार
हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रही कोरोनामुळे प्रभावित झालेलं आहे. या अर्थसंकल्पात या क्षेत्राला दिलासा दिला जाऊ शकतो. हॉटेलांवर लागणारा जीएसटी 18 टक्क्यावरून 12 टक्क्यांवर आणला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेलिंग स्वस्त होण्याची शक्यता आहे.