नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन केले जाते. रमेश पोखरियाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन परीक्षेच्या आयोजनाबाबतची माहिती दिली. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षेचे आयोजन केले जाते.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेट परीक्षेचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने आयोजन करते. 2 मेपासून ऑनलाईन पद्धतीने यंदाची नेट परीक्षा घेतली जाणार आहे. नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यास पात्र ठरतात. विद्यार्थ्यांना यासाठी पदव्युत्तर परीक्षा विहीत गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार यूजीसी-नेट परीक्षा 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 मे रोजी आयोजित केली जाणार आहे. परीक्षांची तारीख जाहीर करताना रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय पात्रता परीक्षा यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतली जात होती. त्यानंतर परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सीबीएसईला देण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन झाल्यानंतर नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाऊ लागली.

यूजीसी नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंना www.nta.ac.in किंवा https://ugcnet.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 पर्यंत परीक्षेचे अर्ज भरता येणार आहेत. तर, 3 मार्च रोजी परीक्षा फी भरता येईल. विद्यार्थ्यानी अधिक माहितीसाठी वरील वेबसाईटला भेट द्यावी.

दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक जाहीर करणार आहेत. शिक्षणमंत्र्यांनी वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

अखेर विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने 4 मे ते 10 जून या काळात होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !