अहमदनगर - आगामी कालावधीत संभाव्य कोविड १९ विषाणू संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक विशेष उपाययोजना लागू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून आता १०० ऐवजी ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
जिल्हयातील धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी मास्क, रुमाल वापरणे व सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) पाळणे, सार्वजनिक ठिकाणी, परिसरात न थुंकणे, धूम्रपान न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुध्द यापूर्वी १०० रुपये भरपाई रक्कम व फी आकारण्यात येत होती. तसे आदेश पोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक दर्जाचे पोलीस अंमलदार यांना दिलेले होते.
परंतु, अजूनही जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, गर्दीमध्ये अनेक जण मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना मास्कचे महत्व पटावे, त्यांना धाक बसावा, यासाठी जिल्हयातील पोलीस आस्थापनेवरील पोलीस नाईक ते पोलीस निरिक्षक या दर्जाचे पोलीस अंमलदार यांना १ मार्चपासून ५०० रुपये दंड आकारणीची कारवाई करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही परवानगी दिली आहे.