कुख्यात गुंड निलेश घायवळ एक वर्षासाठी 'स्थानबद्ध'

खबरदार ! पुण्यात गुन्हेगारी खपवून घेणार नाही - एसपी अभिनव देशमुख

पुणे - पुणे ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गँगस्टर निलेश घायवळला याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई केली आहे. घायवळ याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


कोण आहे निलेश घायवळ ? 

निलेश बन्सीलाल घायवळ (वय 44, रा. कोथरुड) याच्याविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ आणि गजानन मारणे यांच्या टोळीच्या वर्चस्ववादातून शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या दोघांत वाद झाल्यानंतर दोन स्वतंत्र गुन्हेगारी टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. 

काय आहे गँगची पार्श्वभूमी ? 

कुख्यात गजानन मारणे याच्या टोळीने सन २००९ मध्ये निलेश घायवळचा खूनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोन्ही टोळीचे वाद आणखी टोकाला गेले आहेत. कोथरूड पोलिसांनी सन २०१७ मध्ये कुख्यात गुंड घायवळ याच्याविरूद्ध मोकानुसार कारवाई केली होती. त्यानंतर २०२० मध्ये तो कारागृहातून सुटून बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा कोथरुड पोलिसांनी त्याच्यावर दोन वर्षे हद्दपारीची कारवाई केली. त्यामुळे घायवळ शहरातून बाहेर गेला होता. 

तरीही गुन्हेगारी कारवाया सुरूच ? 

पुण्यात असताना घायवळ टोळीने उच्छाद मांडलेलाच होता. पण पोलिसांनी तडीपार केल्यानंतरही निलेश घायवळ याने भिगवण पोलिस ठाण्यातंर्गत एका रेल्वे ठेकेदाराकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. या ठेकेदाराने त्याने अपहरण केले होते. मात्र त्यामुळे त्याची गुन्हेगारी थांबलेली नसल्याचे दिसून आले होते.

नगर जिल्ह्यातुन घेतले ताब्यात

निलेश घायवळ याला पुणे पोलिसांनी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, एपीआय सचिन काळे, सहायक फौजदार दतात्रय जगताप, फौजदार शिवाजी ननवरे, पृथ्वीराज ताटे, रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अक्षय जावळे, इन्क्लाब पठाण, अंकुश माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

यांच्यावरही कारवाईचा बडगा

पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील १७ टोळ्यांमधील ७४गुन्हेगाराना हद्दपार केले आहे. भिगवण, राजगड, आळेफाटा व शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळा उर्फ जगदीश पोपट दराडे, आप्पा ज्ञानदेव माने, राहुल अर्पण भोसले तसेच निलेश उर्फ नानु उर्फ नाना चंद्रकांत कुर्लप या  टोळ्यांवर मोकानुसार कारवाई केली आहे. त्यातील ३१ जणांवर मोकातंर्गत गुन्हे दाखल केले असल्याचे  जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

गुन्हेगारी खपवून घेणार नाही

जिल्ह्यात एमआयडीसी परिसरात काही टोळ्यांची संघटित गुन्हेगारी आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, असा खणखणीत इशारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे गुन्हेगारांची पाचावर धारण बसली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !