केंद्रीय आरोग्य पथक नगरला आले, पण 'असे' चित्र पाहून तेदेखील चिंतेत पडले

अहमदनगर -  दोन सदस्यांचे केंद्रीय पथक शुक्रवारी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शहरात दाखल झाले. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या परिस्थितीतही नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात नाही, त्यामुळे केंद्रीय आरोग्य पथकाने चिंता व्यक्त केली आहे.
 

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना चेहर्‍यावर मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. हे पाहून केंद्रीय पथकही चिंताग्रस्त झाले.

डॉ. एन. गिरीश राव आणि डॉ. सुशील गुरिया या दोन सदस्यांचे केंद्रीय पथक शुक्रवारी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शहरात दाखल झाले. हे पथक तीन दिवस जिल्ह्यात राहणार असून विविध भागांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. 

डॉ. राव हे बंगलुरू येथील एनआयएमएचए संस्थेत साथरोगशास्त्रज्ञ आहेत. तर डॉ. गुरिया हे दिल्ली येथील एसजेएस संस्थेत वरिष्ठ तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. 

शुक्रवारी या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, आदी अधिकारी उपस्थित होते.

या पथकाने जिल्ह्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती, सध्या होत असलेल्या एकूण चाचण्यांचे प्रमाण, रुग्ण बाधित येण्याचे प्रमाण, प्रतिबंधित क्षेत्राची संख्या, तेथील नागरिकांच्या चाचण्या आणि सर्वेक्षण आदींबाबत सविस्तर माहिती घेतली. 

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करा. तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकरात लवकर चाचण्या होणे आणि त्यांच्यावर उपचार सुरु करणे अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हयात रुग्ण संख्येत सातत्याने वाढ दिसत असली तरी चाचण्यांचे प्रमाणही वाढवावे. जेणेकरुन बाधित रुग्णांना शोधून संसर्ग चाचणी तोडणे सोपे होईल. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, यासाठी नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेची त्यांनी माहिती घेतली. लसीकरण जेवढे जास्त होईल, तेवढे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी केंद्रीय पथकाला माहिती दिली. 

जिल्ह्यात महानगरपालिका, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणी रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. याशिवाय, ज्याठिकाणी सध्या रुग्णवाढीचा वेग कमी दिसत असला तरी आगामी काळात तो वाढणार नाही, यासाठी जिल्ह्यातील सीसीसी सेंटर, तेथील बेडस उपलब्धता आणि संभाव्य रुग्णवाढ व होत असलेल्याउपाययोजनांची माहिती पथकाला देण्यात आली. 

बेडस उपलब्धता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना चाचण्या, हॉस्पिटल्सकडून आकारण्यात येणारे बिल आदींसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमून समन्वय साधून काम वेगाने करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे हेही सोबत होते.

कोविड केअर सेंटरला दिली भेट

केंद्रीय पथकाने मनपा क्षेत्रातील बूथ हॉस्पिटल येथे भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधला. त्यानंतर केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन तेथील लसीकरण केंद्राची माहिती घेतली. सुवर्णानगर येथील कन्टेन्टमेंट झोनला भेट देऊन तेथील परिस्थितीचा व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !