अहमदनगर - जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. रुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णाच्या मानसीक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे यावर मदती करण्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे, असे मत जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना रुग्णाच्या व त्याच्या कुटुंबातील लोकांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे काही शिक्षकांना समुपदेशन प्रशिक्षण देऊन रुग्णांना व कुटुंबाला मानसिक आधार द्यावा. तसेही एक वर्षापासून शाळा बंदच आहेत. त्या केव्हा सुरू होतील, हेही सांगता येत नाही.
समुपदेशन करण्याचे काम शिक्षकांनी केले तर हा नवीन उपक्रम इतर जिल्ह्यात राबवतील म्हणून ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, असेही वाकचौरे यांनी सुचवले आहे. शहरात देखील ही समस्या आहे. तेथे मानसोपचार तज्ञ असतात. पण ग्रामीण भागात मानसोपचार तज्ञ नाहीत.
शिक्षकानी सगळे नियम पाळून, सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती व समुपदेशन करावे. झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा उपक्रम राबवून राज्यात आदर्श निर्माण करावा, असेही भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सुचवले आहे.