उल्लेखनीय : शेवगावच्या 'या' शिक्षिकेचे शैक्षणिक व्हिडीओ राज्यात व्हायरल, तीन लाखांहून अधिक मुलांना लाभ

शेवगाव ( MBP LIVE 24 टीम ) : 

'शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू मुले' या शाळेतील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षिका समिराबेगम मोहम्मद वसीम यांनी यु-ट्यूब चॅनलवर तयार केलेले शैक्षणिक व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाले आहेत.

कोरोना संकट काळात शाळा बंद असल्या तरी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून राज्यातील तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी हे  शैक्षणिक व्हिडिओ पाहून अभ्यास केला आहे. उर्दू माध्यमाच्या इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठीचे व्हिडीओ सोशल मिडीयातून विद्यार्थी - पालक - शिक्षकांच्या ग्रूपवर पोहचले आहेत. 

दोन वर्षांपूर्वी प्रारंभ

तंत्रस्नेही  शिक्षिका समिराबेगम मोहम्मद वसीम यांनी सुमारे दोन वर्षांपुर्वी 'उर्दू एज्युकेशनल व्हिडियो' या यू-ट्यूब चॅनलच्या मदतीने शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीला प्रारंभ केला होता. शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीचे राज्याचे मार्गदर्शक भुषण कुलकर्णी व एकनाथ कोरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांनीही मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

१ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त

शिक्षिका समिराबेगम यांनी इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमातील सर्व विषयांतील धड्यांवर उत्कृष्ट असे  शैक्षणिक व्हिडीओ तयार करून ते त्यांच्या यु ट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहेत. त्यांच्या यु ट्यूब चॅनेलला आतापर्यंत सुमारे  तीन लाखाहून अधिक व्हियू तसेच १० हजार सबक्रायर्स मिळाले आहेत.

'मराठी व इंग्रजी'तही व्हिडीओ

यावरून कोरोना लॉकडाऊन काळात त्यांच्या शैक्षणिक व्हिडीओंचा उर्दू माध्यमातील शेवगाव तालुका, जिल्हा व राज्यातील तीन लाखाहून अधिक  विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्हिडीओंचा अभ्यासाठी वापर केला आहे.  काही व्हिडीओ मराठी व इंग्रजी माध्यमातूनही तयार केल्याचे शिक्षिका समिराबेगम यांनी सांगीतले.  

या यशाबद्दल जि.प. उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, प्राथमिक शिक्षक बॅंकेचे चेअरमन सलिमखान पठाण आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !