नियती.
या दोन वर्षात खूप साऱ्या अवघड प्रसंगातून तू घेऊन गेलीस. अनेक कटू, दुःखद प्रसंगाच्या छायेत होतो आम्ही. विश्र्वास, अविश्वासाच्या साऱ्या भिंती कोसळून जे जे ऐकायला, पहायला मिळेल ते स्वीकारायला भाग पाडलंस.. अकल्पित.. अशक्य, वाटणारे सारे क्षण गिळून मुकाट्याने शांत बसायला लावलंस.
जगण्याचे सगळे संदर्भ बदललेस. एका भयाण डोहाचा प्रवास होता सारा. तू जे जे समोर दिलं. ते अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहिलं. हे नियती, आता आमच्या या सगळ्या निष्पाप जीवांना एक आसं दे.. ओठांवर थोडं हसू दे...
इतकं सुखं दे, आनंद दे की, या दिवसातले सारे प्रसंग हळूहळू त्यांच्यातून विसरू दे.
निवळून जाऊ दे त्यांच्या वाटेला आलेलं सारं दुःख. अंधारलेले मळभ दूर होऊन जाऊ दे. निरभ्र होऊ दे त्यांच्या जगण्यातील आकाश. पक्षांचा किलबिलाट ऐकू येईल मग. जगणं आनंदी होईल. प्रेमानं हात हातात घेत सुख, समाधान, शांती घेऊन ये तू. जगण्यावर अन् जीवनावर खूप प्रेम करतो आम्हीं सारे. तू विश्र्वास दे.
सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा..
- जयंत येलुलकर (अध्यक्ष, रसिक ग्रुप, अहमदनगर)