मुंबई - कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर सध्या ८४ दिवसांचे आहे. परंतु, कोविड लसीकरण जलद गतीने करण्याच्या दृष्टीने कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत करता येईल का, याचा फेरविचार करावा, अशी मुख्य मागणी महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्ली येथे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याबाबत विचार करावा. १८ वर्षांखालील मुलांचे कोविड लसीकरण लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.
तसे निवेदन केंद्राला दिले आहे, असे टोपे म्हणाले. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविडसंबंधी मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी निधी पुरवणी पीआयपीमध्ये उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी मांडवीय यांच्याकडे करण्यात आली आहे.