शेतकरी आंदोलनासमर्थनार्थ राळेगणसिद्धीत ट्रॅक्टर रॅली
अहमदनगर : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धीत (अहमदनगर) ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. रॅलीला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून आपला पाठिंबा दर्शवला. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या प्रश्नावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, असे आवाहन अण्णा हजारे यांनी यावेळी केले.
राळेगण येथे प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शेतकरी संघर्ष समन्वय समितीने तिरंगा रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा दिला. संघर्ष समन्वय समिती बरोबरच विविध संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग घेऊन केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला आहे.
शेतकऱ्यांची मागणी नसताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर जाचक कायदे लादले असून हे कायदे व्यापाऱ्याच्या फायद्याचे आहेत, यातून शेतकऱ्यांचा कसलाही फायदा होणार नाही, तर अशा कायद्यांमुळे भांडवलशाहीला बळ मिळेल अशी भावना आंदोलकांनी यावेळी मंडळी.
शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन
दरम्यान, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये. शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.