मुंबई - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांच्याद्वारे जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०१९-२० या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.
सन २०१९-२० या वर्षाकरिता पुरस्कार देण्यात येणार आहेत. क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे : पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्ह्यामध्ये वास्तव्य असावे. वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत.
सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.
खेळाडू पुरस्कारासाठी पात्रतेचे निकष
खेळाडूने पुरस्कार वर्षांसह लगत पूर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. खेळाडुंची मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षालगत पूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरीष्ठ-कनिष्ठ शालेय, राष्ट्रीय शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी आणि यापैकी उत्कृष्ट तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.
वरील प्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक ३० डिसेंबर २०२० पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पु्र्व) मुंबई ४००१०१ येथे सादर करावेत.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२/२८८७११०५ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी कळवले आहे.