अलताफ कडकाले (सोलापूर) - 'खेलो इंडिया युथ गेम्स' पुणे विभागीय खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात सोलापूर तर मुलांच्या गटात पुण्याने विजेतेपद पटकावले आहे. गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या वाडीकुरोलीच्या वसंतराव काळे प्रशालेने अभिनव क्रीडा मंडळ पुणेवर १४-१३ अशी एका गुणांनी निसटती मात केली.
मध्यंतराची ६-५ ही एका गुणाची आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. वाडीकुरोलीकडून प्रीती काळे (२.०० मिनिटे व ४ गुण), अमृता माने (२.१०, १.००मिनिटे व ३गुण) व संध्या सुरवसे (१.४०, १.१० मिनिटे व २ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. शिवानी येंड्रावकरने (१.५०,१.२० मिनिटे ) संरक्षणची खेळी केली.
मुलांच्या गटात पुण्याच्या लोणी स्पोर्ट्स क्लबने अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र निर्मलनगरला २३-२२ असे एका गुणाने नमविले. मध्यंतराच्या १०-११ अश्या पिछाडीवरून पुण्याने सामना खेचून आणला. पुण्याच्या ऋषिकेश खोमणे याने ७ गडी बाद करीत १.४०व १.३० मिनिटे पळती करीत अष्टपैलू खेळ केला.
अभिषेक खोमणे याने ५ गडी टिपले. अहमदनगरच्या अदित्य कुदळे (१.३० व १.०० मिनिटे ५ गडी) व गौरव सोमवंशी (१.५०व१.००मिनिटे) यांची खेळी अपुरी पडली. नेहरूनगर शासकीय मैदानावर झालेल्या या स्पर्धेत सोलापूरसह पुणे व अहमदनगर येथील विजेते संघानी भाग घेतला होता.
मुला-मुलींच्या दोन्ही गटांचे अंतिम सामने राेमहर्षक होते. त्यामुळे क्रीडारसिक सामन्याकडे लक्ष ठेवून होते. सर्वांनाच विजेता कोण होणार याची, प्रतिक्षा होती. हे विजेते संघ आता राज्य स्पर्धेत भाग घेणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी केले.
यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, जिल्हा क्रीडा संघटक अजितकुमार संगवे, राज्य क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र साप्ते, सत्येन जाधव व सुधीर चपळगावकर, न्यू सोलापूर क्लबचे अध्यक्ष मनोज संगावार व उपाध्यक्ष संतोष कदम आदी उपस्थित होते.