अहमदनगर - एप्रिल २०२१ मध्ये राहुरी येथील पत्रकार रोहीदास दातीर यांची आरोपी कान्हु मोरे व त्याचे साथीदारांनी अपहरण करुन हत्या केली होती. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पळून गेलेल्या कान्हू मोरे याला पोलिसांनी पुन्हा एकदा शोधून काढले आहे.
दातीर खून प्रकरणात न्यायालय कोठडीत असताना मोरे याला कोरोना आजार झाल्याने उपचारासाठी सिव्हिल व्हॉस्पिटल, अहमदनगर येथे दाखल केले होते. नंतर त्याला मुतखडयाचा त्रास होऊ लागला. मात्र दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता डॉक्टरानी त्यास ससून हॉस्पीटल, पुणे येथे शिप्ट करायला सांगितले.
यावेळी लघुशंकेचा बहाणा करून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात कान्हु गंगाराम मोरे (रा. वांबोरी ता. राहुरी) विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एक स्वतंत्र पोलिस अधिकारी व पथक फरार मोरे याचा शोध घेत होते. पोलिसांना कान्हु मोरे हा बडवा जिल्ह्यात (मध्य प्रदेश) असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र पोलिस येण्यापूर्वीच कान्हू मोरे तेथूनही पसार झाला.
कान्हु मोरे याला मदत करणारे व आसरा देत असलेले त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरु मरकड (रा. निवडुगे ता. पाथर्डी) व सतिश श्रीकांत हरिचंद्र (रा. धामोरी खुर्द, ता. राहुरी) यांना तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावून अटक केले आहे.
फरार कान्हु मोरेला राहुरी तालुक्यातील गुहा फाट्याजवळील मळगंगा मंदिर परिसरातुन ताब्यात घेण्यात आले. मोरे हा तेथे वेशांतर करुन राहात होता. त्याला तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.