शरद जोशी - एक द्रष्टा कृषी अर्थशास्त्रज्ञ

भारताच्या कृषी जगतात, १९८० च्या दशकात एक वादळ अचानक निर्माण झालं. महाराष्ट्रातच नाही तर पुर्ण भारतातील शेतकरी समाजाच्या व शेतकर्‍यासाठी चळवळी चालवणार्‍यां मध्ये कुतुहल निर्माण करणारं वादळ. या वादळाचं नाव होतं शरद जोशी.


स्वित्झर्लंडमध्ये संयुक्त राष्ट्र संघातील रग्गड पगाराची नोकरी व ऐश आरामाचे जिवन सोडुन भारतात येऊन शेतकरी बनलेल्या शरद जोशींचे विचार शेतकर्‍यांना आकर्शित करू लागले. शेती व शेतमालाचा भाव या विषयावर जे कोणीच कधी मांडले नाही ते शरद जोशी मांडत होते व सामान्य शेतकर्‍यांपासून विविध चळवळीतील नेत्यांना ते पटत होते.

अनेक चळवळीतील युवा नेते शरद जोशींच्या विचाराचे खंदे सर्थक झाले, प्रचारक झाले.  पंजाब पासून तामिळनाडू पर्यंतचे शेतकरी नेते शरद जोशींचे सहकारी बनले. चाकणच्या कांदा आंदोलनापासून शरद जोशींच्या आंदोलक नेतृत्वाची प्रतिमा तयार होण्यास सुरुवात झाली. ज्या काळात सर्वजन शेतकर्‍यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याची मागणी करत होते.

खते स्वस्त द्या, विज स्वस्त द्या, बियाणे, औषधे स्वस्त द्या अशी मागणी करत होते तव्हा शरद जोशींनी, "सूट सबसिडीचे नाही काम, भिक नको, हवे घामाचे दाम" अशी घोषणा करून सर्वांनाच अचंबित केले. कांदा आंदोलनाच्या यशानंतर ऊस, कापूस, तंबाकू अशी अनेक प्रचंड संख्येची व प्रतिभावान आंदोलने शरद जोशींच्या नेतृत्वात झाली.

ऊसाची झोन बंदी, गुर्‍हाळबंदी, लेव्ही, कापूस एकाधिकार खरेदी, राज्यबंदी अशा अशा बेड्या शेतकरी संघटनेने शरद जोशींच्या नेतृत्व‍खाली तोडून दाखवल्या. बोंड अळीला प्रतिकारक कापाशीचे बियाण्यावरील बंदी उठवून, कापसाचा आयातदार असणार्‍या भारत देशाला जगातील सर्वाधिक कापूस पिकवणारा देश व दोन नंबरचा निर्यातदार देश बनविण्याचे श्रेय फक्त शेतकरी संघटना व शरद जोशींन‍ा जाते. 

असे अनेक निर्णय आहेत ज्यामुळे शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावल्या, ग्रामिण भागाचे जिवनमान उंचावले. शरद जोशी शेतकरी नेते, कृषी अर्थतज्ञ म्हणुन जरी विख्यात असले तरी त्यांचा विचार फक्त शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्या पुरता मर्यादीत नव्हता. शेतकर्‍यांच्या खिशात पैसा आला तर पुर्ण देशाची आर्थिक स्थिती सुधारेल, उद्योग व्यवसायांची भरभराट होईल व अनेक समस्यातून मुक्ती मिळेल असा तो विचार आहे. 

चळवळीच्या मार्ग‍ने सर्व प्रश्न  सोडवता येत नाहीत, व्यवस्था बदलायची असेल तर विधीमंडळात जावे लागेल, सत्तेत जावे लागेल याची जाणीव झाल्या नंतर शरद जोशींनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. या प्रयोगाला काही प्रमाणात यश मिळाले. शरद जोशी स्वत: स्वतंत्र भरत पक्षाचे खसदार म्हणुन राज्यसभेत गेले. पण त्यांना अपेक्षित "यश" मिळणे बाकी आहे.

गेली वर्षभर दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाने शेतकर्‍यांना काही प्रमाणात का होईना मिळणारे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. या परिस्थितीत शरद जोशी असायला हवे होते, असे सर्वांनाच वाटत आहे. आंदोल‍न‍ामुळे किंवा सरकारने कायदे करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एक गोष्ट चांगली झाली. ती ही की देशात पहिल्यांदा देशाचे कृषी धोरण चर्चेला जात आहे. गांभिर्याने चर्चिले जात आहे. 

देशातील बहुतेक कृषी अर्थशास्त्रज्ञ शेती व्यवसायाला स्वातंत्र्य देण्याच्या बाजूचे आहे, हेही सपष्ट झाले. भारत कृषी प्रधान देश आहे पण देशाला कृषी धोरणच नाही ही माहिती अनेकांना नविन होती, धक्कादायक होती. आज देशात कृषी धोरणावर चर्चा सरु आहे. समाजवादी गटांनी शेतकर्‍यांची दिशाभूल करून येऊ घातलेले स्वातंत्र्य दूर लोटले आहे.

हे  बाजाराचे स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य हा शेतकर्‍यांचा व्यवसायसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविण्यासाठी शरद जोशींनी तयार केलेले शिलेदार स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन चालत आहेत. संघर्ष सुरु आहे व या संघर्षाला यश येणे अनिवार्य आहे कारण देशाला शरद जोशींच्या विचारा शिवाय दुसरा पर्यायच नाही.

अनेक दशके पुढे पाहण्याची क्षमता व त्याची अचूक अर्थशास्त्रीय मांडणी करण्याचे कौशल्य असणारा द्रष्टा नेता आज आपल्यात नसला तरी त्यांचे विचार येणार्‍या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत रहातील. प्रत्येक जीव अधिकाधिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धडपडत असतो. 

शेतकरीही धडपडत राहणार आहेत. या धडपडीला यश प्राप्त होण्यासाठी, शरद जोशींच्या विचाराला विजय मिळवून देण्यासाठी झटत रहाणे यातच  आपला स्वार्थ आहे, आणि हीच या योद्धा शेतकर्‍याला खरी आदरांजली ठरेल.

- अनिल घनवट (राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !