अहमदनगर - जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरु झालेला कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेईना. रविवारी तब्बल ८४७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३१८ खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८७ आणि अँटीजेन चाचणीत १४२ रुग्ण बाधीत आढळले आहेत.
गेले सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाचशेहून अधिक कोविड बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे आगमन झाल्याचे स्पष्ट आहे. परंतु, ही लाट लवकरात लवकर थोपवायची असेल, तर नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
रविवारी दिवसभरात २२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५२ हजार ७२२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९६.९१ टक्के आहे.
जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ८३ इतकी झाली आहे. रविवारी नगर महापालिका हद्दीत सर्वाधिक (तब्बल २८० कोरोनाग्रस्त) रुग्ण सापडले आहेत. तर राहाता तालुक्यात १०९ बाधित रुग्ण आढळले आहेत. अकोले तालुक्यात ६२ जणांना बाधा झाली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका - कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले म्हणजे आपल्याला कोरोना होणार नाही, अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कारण, अजूनही अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी विनामास्क वावरत असल्याचे दिसत आहे.