अहमदनगर - महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीवर येथील सामाजिक, सांस्कृतीक, साहित्य क्षेत्रातील धडाडीचे कार्यकर्ते जयंत येलुलकर यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे राज्याच्या विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत पंडित विद्यासागर, सुहास पळशीकर, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, किशोर कदम, डॉ. श्रीपाद जोशी, पी. विठ्ठल, मिलिंद जोशी अशा नामवंत साहित्यिकांचा समावेश आहे.
जयंत येलुलकर यांचा या समितीत समावेश हा अहमदनगर शहराच्या दृष्टीने मोठा सन्मान आहे. रसिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे विभागीय कार्यवाह, तसेच म. सा. प. सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह या पदांवर कार्यरत आहेत.
याशिवाय ते माजी नगरसेवक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मा. मॅनेजिग कमिटी सदस्य व प्रशासकीय समिती सदस्य असून पुणे येथील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियम उभारणीत त्यांनी स्टेडियम समिती सदस्य आणि समन्वयक ही जबाबदारी यशस्वीपणे निभावली आहे.
या कार्याचा गौरव म्हणुन तत्कालिन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणुन त्यांनी जबाबदारी पाहिलेली आहे.
नगरच्या साहित्य क्षेत्रात त्यांनी म. सा. प. सावेडी उपनगर आयोजित विभागीय साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली होती.
शासनाच्या या राज्यस्तरीय समितीमार्फत आगामी ३५ वर्षांसाठी राज्याचे मराठी धोरण ठरविणे, भाषा अभिवृद्धीसाठी नवनवीन उपाय व अभिनव कार्यक्रम सुचविणे, परिभाषा कोषचे पुनर्मुद्रण इत्यादी महत्वाची कामे करण्यात येणार आहेत.
जयंत येलुलकर यांच्या निवडीबद्दल मंत्री शंकरराव गडाख, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, मसाप सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेन्द्र फिरोदिया, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, मेधाताई काळे, डॉ. सुधा कांकरिया, ज्येष्ठ पत्रकार सतीश डेरेकर, शब्दगंध साहित्य परिषदेचे राजेंद्र उदागे, श्रीधर अंभोरे, नंदकुमार आढाव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.