मुंबई - महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा एकदा कोरोना आजारावर मात केली आहे. त्यांना शुक्रवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. परंतु, अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना कोणालाही भेटता येणार नाही. तनपुरे यांना गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली होती.
स्वत: प्राजक्त तनपुरे यांनीच टि्वटरवर ही माहिती दिली होती. तसेच कार्यकर्त्यांना व संपर्कात आलेल्या लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होतेे. त्यानंतर मंत्री तनपुरे हे मुंबईत एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी वैद्यकीय उपचारांना साथ दिल्यामुळे ते बरे झाले आहेत.
मंत्री तनपुरे यांनी पुन्हा एकदा टि्वटरवरून ही माहिती दिली आहे. शुक्रवारी दुपारी आपण दुसऱ्यांदा कोरोनावर मात केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरीही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना आणखी काही दिवस त्यांना भेटता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वांना प्रत्यक्ष भेटणे पुढील काही दिवस तरी शक्य नाही. तुम्हा सर्वांचे माझ्यावरील प्रेम मी समजू शकतो. मात्र राज्यातील विविध भागातून स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईत भेटायला येऊ नये, ही माझी कळकळीची विनंती आहे, असेही प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.