अहमदनगर - कोरोना महामारीत पत्रकार व वृत्त छायाचित्रकारांनी घराबाहेर पडून वास्तविकता मांडण्याचे काम केले. सर्वसामान्यांना बिकट परिस्थिती अवगत केली. तसेच जनजागृतीचे कार्य केले, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते भालसिंग यांनी वृत्त छायाचित्रकार वाजिद शेख यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. वृत्त छायाचित्रकार वाजिद शेख यांनी कोरोना कालावधीतही आपले कर्तव्य एकनिष्ठपणे बजावले. जेथे सर्वसामान्यांना जात येत नव्हते, त्या गोष्टी शेख छायाचित्रांद्वारे दर्शवत होते.
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग म्हणाले की, विविध माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकारांनी केले. अवघड परिस्थितीत पत्रकारिता करुन दिशादर्शक भूमिका निभावली. त्यामुळे पत्रकार आणि वृत्त छायाचित्रकार यांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वाजिद शेख यांनी अहमदनगर शहरात कोरोना परिस्थितीचे वास्तव आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. अमरधाममध्ये अंत्यविधींसाठी लागलेल्या रांगा व तेथील परिस्थिती त्यांनी छायाचित्रांमधून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवली. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाचे नियम पाळण्याविषयी जनजागृती झाली, असेही ते म्हणाले.