अहमदनगर – केडगावच्या एका नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देणे तसेच त्यांच्या खुनासाठी तीन कोटीची सुपारी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याचा मास्टरमाईंड शोधून काढण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
नगरसेवक अमोल येवले यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणीही शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी १३ एप्रिल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, राजेंद्र दळवी, अभिषेक कळमकर, नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, अभिषेक भोसले, गिरीष जाधव, रावजी नागरे आदी उपस्थित होते.
नगरसेवक येवले यांना जीवे मारण्याची धमकी आली. त्यांच्या खुनाची तीन कोटीची सुपारी देण्यात आल्याचे उघड झाले असल्याने त्याच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
त्यांना धमकी देण्याच्या प्रकार मागे तसेच खुनाची सुपारी देणारा मास्टर माईंड कोण आहे याचा पोलिसांनी तातडीने तपास करून कठोर कारवाई करावी, तसेच नगरसेवक येवले यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
तयावर बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्याच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.