आधार माणुसकीचा ! चेहऱ्यावर रुमाल व मास्क बांधून 'या' महिला बसस्थानकात आल्या, अन..

अंबाजोगाई - अनेकांनी केलेल्या मदतीची जाणीव लक्षात घेऊन रविवारी (दि.२९) कोवीडसह शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी प्रत्यक्ष हातात खराटा घेऊन येथील बसस्थानक स्वच्छ केले. या उपक्रमात ग्रामीण भागातील २५ महिला सहभागी झाल्या होत्या.

पतीचे छत्र हरवल्यानंतर जिद्दीने अनेक संकटाना सामोरे जात, आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलांही विधायक उपक्रम राबवू शकतात, असा आदर्श महिलांनी या स्वच्छता उपक्रमातून समाजासमोर ठेवला आहे.

येथील आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी मांडलेल्या संकल्पनेला प्रतिसाद देत सामाजिक उत्तरदायित्वाचा हा उपक्रम राबविला.  रविवारी या महिला एका कार्यक्रमात ब्लॅंकेटची मदत स्वीकारण्यासाठी आल्या होत्या.

हा कार्यक्रम झाल्यानंतर गावाकडे जाण्यापूर्वी हा स्वच्छतेचा उपक्रम राबविण्याची संकल्पना ॲड. पवार यांनी त्यांच्यासमोर मांडली. त्यांनी या सामाजिक कार्यास होकार दिला. महिलांची समंती मिळाली, पण स्वच्छता करण्यासाठी झाडू नव्हते.

ते शेजारी, पाजारी मागून आणले, कचरा गोळा करण्यासाठी पोतेही जमा केले. त्यानंतर या महिलांनी दुपारी प्रत्यक्ष स्वच्छतेला सुरूवात केली. या महिला घरातील व परिसराची झाडझुड रोज करतात, परंतु सार्वजनिक बसस्थानकाची स्वच्छता करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती.

या कामात प्रचंड धुळ उडणार असल्याने, महिलांनी चेहर्‍यावर रुमाल व मास्क बांधून तासाभरात सर्व बसस्थानक चकाचक केले. जमा झालेला कचराही जागेवर न ठेवता, तो गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.

या उपक्रमात अंबाजोगाईसह राडी, पूस, साकुड, वरवटी, सुगाव, धानोरा (बु) कुंबेफळ, सोनवळा, पोखरी, तळेगाव घाट, लिंबगाव तांडा, सेलूअंबा या गावातील महिला सहभागी झाल्या होत्या. 

यावेळी स्थानकप्रमुख अमर राऊत, गणेश लाड, संतोष माकेगावकर व बस प्रवासी यांनी आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. पवार, सामाजीक कार्यकर्ते भगवंत पाळवदे यांच्यासह महिलांचे स्वागत केले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !