MBP Live24 - 'बॉईज' आणि 'बॉईज २' ला प्रेक्षक व समीक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाचे कथानक व अभिनय सर्वांनाच प्रचंड आवडले होते. आता 'बॉईज 3'चे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
'बॉईज' व 'बॉईज २'मुळे धैर्य, ढुंग्या, कबीर यांच्या त्रिकुटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. हा चित्रपट तिघांच्या आयुष्याभोवती फिरत असताना त्यांच्या त्रिकुटात आता विदुलाही सामील झाली आहे. तिच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात काय बदल घडतात, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.
त्रिकुट व विदुला सोबतच्या प्रवासाची कहाणी 'बॉईज ३'मध्ये बघायला मिळणार आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड व विदुला चौगुले यांचा उत्कृष्ट अभिनय असलेला हा चित्रपट १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चित्रपटातील 'लग्नाळू २.०' गाण्याने प्रेक्षकांमध्ये भलतीच क्रेझ निर्माण केली आहे. सर्वांना नाचायला भाग पडणाऱ्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत असून मुग्धा कऱ्हाडेचा कमाल आवाज लाभला आहे. 'लग्नाळू' गाण्याप्रमाणेच 'लग्नाळू २.०' गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे.
या गाण्यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्यासोबत विदुलाने जबरदस्त ठेका धरला आहे. राहुल ठोंबरे व संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, " 'बॉईज ३' च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. ही उत्सुकता पाहुन मला खूप आनंद होत आहे. 'बॉईज ३' च्या संपूर्ण टीमने भरपूर मेहनत घेतली आहे.
कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम बजावल्या आहेत. 'बॉईज' व 'बॉईज २' च्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर 'बॉईज 3' प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत. अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे.
तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मिती केली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी 'बॉईज ३' चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.