गर्दी माणसांचीच आहे पण माणसे एकटी पडू लागली. आपण गर्दीत असतो, पण ती गर्दी आपली असते का.? तिथे माणसे आपली असतात का? आपल्याकडे कुटुंब असते, नातेवाईक असतात, भला मोठा मित्रपरिवार असतो. पण खरच त्यांच्याशी आपण मोकळ्या मनाने बोलू शकतो का?
आणि जरी बोलायचं म्हटलं तरी ते कितपत अपल्याला समजून घेतील, याचीही शाश्वती आपल्याला नसते. त्यापेक्षा आपल्या मनातील गुपित कुणाला न सांगितलेलच बरं, असं अनेकांना वाटतं.
कारण विषय भावनांचा असतो. ज्या आपल्या मनाशी जोडलेल्या असतात. त्या भावनांवरच आघात झाला, तर माणूस तिथे जास्त तुटला जाण्याची शक्यता असते.
निसर्गाने आपल्या अवयवांची रचना फार सुंदर केलेली आहे. प्रत्येक अवयवाचं काही ना काहीतरी काम आहे. तशी आपली कृती असण गरजेचं असतं. तसं न झाल्यास त्याचे परिणाम आपल्या अवयवांवर दिसून येतात.
चीडचीड होते, ताणतणाव वाढतो. सध्याच्या युगात पाहता आसपास गर्दी खुप आहे, पण माणूस फार एकटा पडत चाललाय, आतल्या आत गुरफटतो. व्यक्त होता येईल, असं योग्य ठिकाण, व्यक्ती, साधन जवळ नसल्याने गर्दी असूनही तो एकटा आहे.
जस शरीर जगवण्यासाठी अन्न, पाणी लागतं, त्याचप्रमाणे मन जगवण्यासाठी मनाला समाधान हवं असतं. आणि हाच विचार अपुरा पडल्याने हसत्या खेळत्या मनाला निराशा, उदासपणा, आळसपण यांचे ग्रहण लागते.
मनाच्या आनंदाच्या कल्पना आपल्या व्यावहारिक जीवनापेक्षा खुप वेगळ्या असतात. ज्या समजून घ्यायला आपणही कधी कधी कमी पडतो. जसे आपले या समाजातील घटकांशी वेगळे बंधन असते तसेच बंधन स्वतःशी असण फार गरजेचं असतं.
यामुळे आपण स्वतःबद्दल संवेदनशील राहतो व स्वतःवर नियंत्रण ठेवता येते. इतरांशी संवाद साधणे, व्यक्त होणे, मनाला आनंदी ठेवणे, मान, अपमान, यश, अपयश यांनी लक्ष विचलित न होऊ देता अनुभवाने पुढे सरकणे फर गरजेचे असते.
या धावपळीच्या जगात आपल्याला कुणी समजून घेवो अगर न घेवो, पण आपल्यालाच आपला चांगला दोस्त नक्कीच होता आलं पाहिजे.
- शुभांगी माने (काष्टी, अहमदनगर)