आपण तिला 'माणूस' समजणं, हे फार महत्त्वाचे आहे..!

आमच्या ह्यांना ना, तव्यावरची पोळी ताटात लागते. अगदी गरमगरम तूप लावलेली. एक सांगते, माझ्या नवऱ्याला ना मी नोकरी केलेली अजिबात आवडत नै.. म्हणून मी एवढी सॉफ्टवेअर इंजिनियर, पण त्याला आवडत नै म्हणून नाही करत नोकरी.


आमच्या पप्पूला (वय वर्ष दहा) ना, मासे अजिबात आवडत नाहीत. मग आम्ही आता आणतच नाही घरात. नवरा किंवा मुलगा यांच्या पसंतीनुसार घरातील बऱ्याच गोष्टी ठरत असतात. पुरुषसत्ताक पध्दतीने स्त्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या पध्दती ठरवल्या आहेत.

पुरुषांच्या आवडी-निवडीचं इतकं कौतुक असतं, पण स्त्रीच्या पसंती, नापसंतीची काळजी कुणी करत नाही. हे तिच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. हे करण्यात स्त्रियांचा सहभाग मोठा असतो.

इथे त्या पुरुषसत्ताकपध्दतीच्या वाहक म्हणूनच जगत असतात. 'आयुष्य तिचे तिचे, निर्णय मात्र दुसऱ्यांचे' (वडिल, पती, मुलगा इ.) हे समीकरण चुकीचे आहे. ते पहिले बंद व्हायला हवे. मगच स्त्री पुरुषांमध्ये सुदृढ आणि निकोप नाती निर्माण होतील.

यासाठी तिला 'माणूस' समजणं हे फार महत्त्वाचे आहे. सहसा मुली मोठ्याच आज्ञाधारक असतात. लहानपणी बाप, भाऊ, यांच्या आज्ञेत. तर लग्न झाल्यावर नवरा, सासरा, दिर इ. लोकांच्या.

बरं पुरुषसत्ताक पध्दतीच्या वाहक आई किंवा सासू तुम्हांला घरच्या तथाकथित परंपरा, कर्मकांड तुम्ही कशा पाळल्या पाहिजेत, हे सतत  सुना, मुलींच्या मनावर बिंबवत राहतात. पण मुलींना, स्त्रीलाही तिची स्वतःची मतं आहेत. कारण तीही हाडामांसाची माणूस आहे.

आणि त्या हाडामांसात एक जितंजागतं मनही आहे, हे लक्षात ठेवायला हवं. मुलाला, नवऱ्याला काय आवडतं, हे लक्षात ठेवणं गैर नाहीच. पण स्वतःला आणि घरातील लेकीसुनांना काय आवडतं, हेही जरुर लक्षात ठेवावं.

तिनं सदा सेवेशी तत्पर असावे, अशी अपेक्षा करणं म्हणजे तिचं माणूसपण मारुन टाकणं. तिला आनंदी ठेवा आणि मग बघा घर कसं आनंदानं उजळून निघतं..! नाहीतर माझीच एक कविता मला सतत आठवते..
 
आई मेली,
तिसऱ्या दिवशी लोक म्हणाले,
नैवद्यावर ठेवा तिला काय आवडतं ते
नवऱ्याने उडविले खांदे,
मी असतो व्यस्त
मलाही नाही माहित
तिला काय आवडतं ते..

मुलगा म्हणाला,
आमच्याच आवडीचं नेहमी घरात शिजायचं
मलाही नाही माहित
तिला काय आवडतं ते..

मुलगी म्हणाली..
'मला चालतं गं', असं म्हणून
ती उरलसुरलं खायची
मलाही नाही माहित
तिला काय आवडतं ते..!

काय काय ठेवलं,
मेवा न मिठाई
पिंडाला कावळा शिवलाच न्हाई...!

ती माणूस आहे. तिलाही काही इच्छा असतील. साधं खायला सुध्दा तुमच्या घरात तिला मिळत नसेल, तर माणूस म्हणून घ्यायला तुम्ही लायक तर नाहीच पण तुच्छ आहात.! हेच खरंय बाकी सारंं मिथ्या. तुम्ही कुठल्या कॕटेगिरीत मोडता पहा आत्मपरीक्षण करुन.!

माफ करा कुणाला दुखवायचं नाही, पण हल्ली सतत मुलींच्या अपेक्षा खूप असतात, असा बोभाटा ऐकू येतात. तुम्हांला लग्न करुन सहचर हवीय का यंत्रमानव हवीय ? हे एकदा ठरवा मग लग्न करायला बाहेर पडा.

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापुर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !