अहमदनगर - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्त बातमीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर यांनी त्यांचे पथकासह चैतन्य सुभाष मंडलिक यांच्या राहते घरी रायतेवाडी (ता. संगमनेर जि. अहमदनगर) येथे दारुबंदी कायद्यानुसार छापा मारला.
या छाप्यामध्ये गोवा राज्य दमण व दिव राज्य निर्मितीचा व बनावट विदेशी मद्याचा साठा मिळून आलेला आहे. हुंदाई व्हेन्यू कंपनीची पांढऱ्या रंगाची एक चारचाकी वाहन क्र. एमएच १७ सीएम ४२६८, आरोपीकडून तीन मोबाईल इत्यादी साठा जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या व बनावट बुच वापरुन त्यात परराज्यातील मद्य भरुन ते महाराष्ट्र राज्यातील मद्य असल्याचे भासवून मद्यविक्री करुन शासनाचा मुहसुल बुडविण्याचा आरोपीचा हेतू असल्याचे दिसून येते.
या गुन्हयांत एकूण १४ लाख २८ हजार ९५० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. परराज्यातील विदेशी मद्याचा साठा तसेच बेकायदेशीरपणे बनावट मद्य निर्मिती करीत असल्याने या गुन्ह्यात चैतन्य सुभाष मंडलिक व सुरेश मनोज कालडा, या दोन आरोपिंना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा पुढील तपास सुरु आहे.