औरंगाबाद - शहरातील एक पोलिस ठाणे उडणार आहे, अशी धमकी देणारा कॉल औरंगाबादच्या पोलिस नियंत्रण कक्षाला आला आणि खळबळ उडाली. लागोपाठ चार वेळा असा फोन आल्याने पोलिसांचे धाबे दणाणले. मात्र ही धमकी देणाऱ्या २३ वर्षीय युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नियंत्रण कक्षात धमकीचा फोन येताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. काही वेळातच फोन करणाऱ्या युवकाला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. पण तोपर्यंत पोलिस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुभम काळे ( वय २३, वर्षे रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) असे आरोपी युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ ऑगस्ट रोजी पोलिस नियंत्रण कक्षात अज्ञात व्यक्तीने चार वेळा फोनव्दारे शहरातील कोणतेही एक पोलिस ठाणे उडणार, अशी धमकी देणारा फोन केला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेचे तीन पथक तपासाठी रवाना झाले. सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक माहितीनुसार या मोबाईल धारकाचे नाव शुभम काळे असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला चिकलठाणा एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने अशाप्रकारे धमकी का दिली याचा पोलिस शोध घेत आहेत
जर पोलिसांना खोटी माहिती दिली, किंवा व अफवा पसरवली, तर औरंगाबाद पोलिसांकडून कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा औरंगाबाद शहर पोलिसांनी दिला आहे.