दुनिया बदलली दोस्त. जरा एकदा मागे वळून पहा..!

जिंदगीके सफर मे.. गुजर जाते है जो मकाम... वो फिर नही आते... वो फिर नही आते... खऱ्याच आहेत गुलजारजी यांच्या या भावना. किती छोटंसं आयुष्य आहे ना आपलं..

या छोट्याश्या आयुष्यात किती कंगोरे आहेत आपल्या जगण्याचे. प्रत्येकाला जगायचं. आनंद घ्यायचा. सुख मिळवायचं. बायको, मुलाशिवाय कोणीही वाटेकरी नसावा या सुखाचा.

गेले ते दिवस... फेर धरण्याचे, अंगत पंगत करण्याचें. एकत्र आनंद मिळवायचे. तो काळ होता. थोडासा आम्हीही पाहिला. नाती होती, संवाद होता. प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता होती. इतरांच्या सुखात आनंदोत्सव करणारी माणसे होती.

सुखाच्या या साऱ्या कल्पना, स्वप्न छोटी छोटी असायची. पण त्यात आभाळाएवढं सुख असायचं. रक्ताची नाती आपली होती. एखाद्याला जखम झाली की वेदना आपल्यालाही असायची. निरपेक्ष.

हा माझा मित्र. हा माझा भाऊ, हे सांगण्यात कौतुक, अभिमान असायचा.! पण आता दुनिया बदलली वेड्या. हे काय घेऊन बसलास.? स्वार्थ, ईर्षा, स्पर्धा. हे सगळं पहायला मिळतं ना तुला. संपली नाती. तो ओलावा तर केव्हाच गायब झालाय.

अन् तू का रडत सुटलास. डोळे पूस. जग खूप सुंदर आहे. खुप खुप सारी माणसे आपलीही आहेत. त्यांच्या डोळ्यात पहा. बघ, ते तुझ्यावर नितांत प्रेम करीत असतील..! ती तुझी नाती. तिचं खरी तुझी माणसं..!

अन् उगीच नात्या गोत्याच्या मंडपात काय धावत सुटलास..? जोपर्यंत त्यांना तु हवा आहेस... तो पर्यंतच तु, हे लक्षात असु दे. अन् जी काही नाती असतील थोडीफार.. ज्यांना तुझा कळवळा आहे त्यांना हात पुढे कर. अलिंगन दे. त्यांच्यासाठी धाव. सामील हो त्यांच्या सुख दुःखात.

नाहीतर माझी माझी म्हणत राहून जाईल तुझंच. जगण्याचं स्वप्न बघ, चांगलं पहा. सारं आकाश तुझंच आहे. आशा आहेत तोपर्यंत तु आहेस. निराश होऊ नकोस.! पश्चाताप करु नकोस, अन् वाईटही वाटून घेऊ नकोस.

काही खिडक्या बंद होतील तुला पाहून. जेव्हा त्यांना तुझ्याजवळ द्यायला काही नसेल. पण काही दारे खुली आहेत जे तुझी खूप वाट पाहत असतील. त्यांना भेट. आठवणीत रमून जा. नाहीतर शाळा सुटली तरी तुला कळणार नाही. आपण वर्गात होतो. ज्यांना तुझी आपुलकी. त्यांच्यावर भरभरून प्रेम कर.!

दुनिया बदलली दोस्त. जी तुझी आहेत असं तुला वाटतं.. तर एकदा मागे वळून पहा. दिसताहेत का.. की गायब झालीत.? नाहीतर खूप कमव. चोऱ्या कर. अधून मधून नोटा दिसू दे. मग बघ, तुझ्या घरात तुझीही मुखवटे घातलेली नाती खचाखच भरलेली असतील.

हरवून जाशील, कळणारही नाही तुला.. नेमका कोणाला माझा म्हणू.. तेव्हा या भानगडीत पडू नकोस.. नाहीतर समुद्रात तुझे पाय जरी बुडवलेस तरी कोरडेच राहतील..

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !