घोडेगाव ग्रामस्थांनी घडवले माणुसकीचे दर्शन
किर्र काळोखात, अंगावरील जेमतेम कपड्यात, कडाक्याच्या थंडीत कुडकुडत फिरणाऱ्या बेघर निराधार मनोरुग्ण मातेला दि. १४/०१/२०२३ रोजी रात्री १:०० वा. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या 'मानवसेवा' प्रकल्पाने आधार दिला.
अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव ते शनिशिंगणापूर रोडवर मुळा इरिगेशन कॉलनीसमोरील परिसरात ही महिला फिरत होती. इतक्या रात्री ही महिला वाहनाने जाण्याचे सोडून अंधारात लपत आसरा शोधत होती.
रिक्षाचालक सचिन आल्हाट, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी नाना वैरागर यांनी सर्वप्रथम तिला पाहिले. त्यांनी ही माहिती पत्रकारांना सांगितली. त्यांनी सोनई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चौधरी यांना माहिती देऊन मदतीसाठी आवाहन केले.
पोलिस येईपर्यंत बहिरु वाघ व त्यांच्या पत्नी, तसेच अनिल पाटील सोनवणे, विजय जाधव, किशोर प्रधान, रमेश गीते, मनोज बोरुडे, बाळासाहेब दुशिंग, विशाल साळवे, गौरव जाधव, आदींनी तिची विचारपूस करत आसरा दिला.
तसेच साईनाथ भोसले, किशोर सोनवणे, अंबादास सरोदे, नागेश वैरागर, अशोक सातपुते, संजय शहाराव, आबा लोखंडे, बाळा लोंढे, आदींनी पोलिसांना येईपर्यंत या मदतकार्यात सहकार्य केले.
रात्रीची वेळ अन् त्यात महिला ही मनोरुग्ण असल्यामुळे पोलिसांसमोर या महिलेच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब अकोलकर यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना माहिती दिली.
दिलीप गुंजाळ व संस्थेच्या स्वयंसेवकांनी रस्त्यावर फिरणाऱ्या या मनोरुग्ण मातेला ताब्यात घेऊन श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या 'मानवसेवा' प्रकल्पात आधार दिला आहे.
तिच्यावर मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर व डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने या मातेवर मानवसेवा प्रकल्पात उपचार सुरू केले आहेत. घोडेगाव येथील रिक्षाचालक सचिन आल्हाट, साईनाथ भोसले, आदींनी यापूर्वीही जालना येथील एका मनोरुग्ण युवकाला आसरा देत सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधिन केले होते. घोडेगाव ग्रामस्थांच्या या माणुसकीचे कौतुक होत आहे.