मग सुखाचा शोध संपणार तरी केव्हा...?

रोजचं आयुष्य...
नवी स्वप्न.. 
नव्या आशा..
आनंदाची तोरणं बांधण्याची 
चाललेली आपली धडपड..

प्रत्येकाचं जगणं वेगळं.
त्यांचे आनंद वेगळे...
धावतोय मात्र सगळे...
न थकता,
अगदी घामाघूम होईपर्यंत..

थकलेला चेहरा रुमालाने पुसायचा..
वाऱ्याची झुळूक घ्यायची...
अन् नवी ऊर्जा घेतं पुन्हा धावत सुटायचं...

काही मिळवायचं...
हातातून निसटलेलं सुटताना
काही दुःखी व्हायचं
ओंजळ भरून गेली तरी 
जे निसटलं...
त्याचा विचार करत बसायचं..

हुरहुर लावायची
मात्र जे गवसलं त्याची किंमत शून्य..
जे राहिलं तो पराभव..
जिव्हारी लागलेला...

सुख रोजचं येतं..
मोगरा फुलतो..
सडा पडतो...
तेव्हा ताटवा हवा ...
सुख रोजचं मांडीवर,

तरीही अजून काहीतरी हवं.
मग सुखाचा शोध संपणार तरी केव्हा...?
चालूच राहणार तो, निरंतर ..!
लटकवत ठेवलाय त्याला डोळ्यासमोर..
आशा तीच तर आहे...

अस्वस्थता असली की जग बनवायची ताकद येते आपोआप...
नाहीतर डोळे मिटले की स्वप्न पडतातच..
जगण्याचं भान हवं...
सुख समजायला हवं

नाहीतर लाटा कितीही कोसळल्या,
तरी आपण मात्र कोरडेच..
मित्रा,
सुर्य तुझ्यासाठीच तर येतो रोज,
अलोट किरणांची गर्दी घेऊन..
तुझ्या अंगणात....!

- जयंत येलुलकर (अहमदनगर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !