'मांजाला ढील देणं' म्हणजेच नात्यांना निरोगीपणे वाढवणारं चिंतन

पलीकडच्या टेरेसवर एक बाबा आपल्या लेकाला पतंग उडवायला शिकवत होते. "पवन, अरे पतंग थोडा हाताने उडवायचा मग थोडा खेचायचा, वाऱ्याच्या झोक्याबरोबर तो पुढं जायला लागला ना, की मग ढील द्यायची मग बघ कसा वरवर उडतो." मुलाने विचारलं, "अरे बाबा, ढील द्यायची म्हणजे काय करायचं.?"

"अरे रिंगीतून हळूहळू दोरा सैल सोडायचा.. पतंगाला स्पेस मिळाली की बघ पतंग कसा वर वर जातो...!" मी पहातच राहिले.. शहाणा बाबा. साक्षात पवनला कसं उडायचं शिकवत होता. त्यांच्यातील ते दोस्तीचं नातं आवडलं मला..! 

पवनला इकडून हात हलवून निरोप देऊन मी हळूहळू जिन्यावरुन खाली उतरले. आज पवनच्या निमित्तानं नात्याला, मुलांना निरोगीपणे वाढवायला मदत करणारं चिंतन सापडलं. मुलांना कधी हट्ट केल्यावर मागे खेचायचं असतं, अन मग ते जाग्यावर आले की अशी ढील द्यायची की ते वेगाने प्रगतीच्या आकाशात उडान घेतील.

आपण अभिमानाने खालून, दुरुन मायेच्या नजरेने आपल्या या पतंगाची जगाच्या आकाशातील झेप पहात रहायची. आणि हे करत असताना आपला जिव्हाळ्याचा पतंग कटू नये, तुटू नये म्हणून न कळत हलकासा धागा आपल्या हातात ठेवायचा.

पण पतंग पुढे जाताना त्या पतंगावर हक्क दाखवणं सोडता आलं पाहिजे. आपल्या पतंगाला सजवतो, वाढवतो. पण ही ढील देणं विसरतो, अन नात्यांच्या जंजाळात अडकवायला पाहतो. त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात दुसरं माणूस येतं ना.. तेव्हा आपण तिसरं होतो.

आणि दोघांच्या नात्यात तिसऱ्याला स्थान नसतं. हे तिसरं स्थानही त्यांची छोटी छोटी रुप येतात. तेव्हा तर आपण चौथ्यावरच जातो. तेव्हा या लेकरांच्या नात्यांना ढील द्यायला हवी. होय ना ? तुम्हाला काय वाटतं ? नाहीतर म्हणाल स्वप्नजाजिजींच्या डोस्क्यातून काय काय येतं... होय ना ! 

- स्वप्नजा घाटगे (संपादक : सखीसंपदा, कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !