अहमदनगर - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर अंतर्गत आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह, पारनेर आयोजित कार्यशाळेस सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणुन शुभांगी माने, अविनाश कराळे, दुपारच्या सत्रात भास्कर मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदयार्थी नितीन देशमुख व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल भांगरे यांनी केले. अशोक काळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुजाता शेरखाने या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या कार्यक्रमाला १०० मुलं मुली व कर्मचारी ब्रम्हदेव सानप, सुभाष मोरे व रमेश गायकवाड उपस्थित होते.
व्याख्याती शुभांगी माने यांनी व्यक्तीमत्व विकास विषयावर विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून संवादात्मक चर्चा करून मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांनी स्वयंमूल्यांकन करून स्वतःच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे.
आजचे युग वेगाने पुढे जात आहे, या वेगवान जगात टिकून राहण्यासाठी आपण स्वतःमध्ये चांगले बदल करून आपल्या गुणांचा विकास केला पाहिजे. 'अत्त दिपो भव' (स्वयंप्रकाशित व्हा) या गौतम बुद्धांचे विचार स्मरण करुन उदाहरणाद्वारे प्रेरणा निर्माण केली.
या सत्रामधून अनेक विद्यार्थ्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. अविनाश कराळे यांनी सर्वात महत्वाचा विषय आरोग्यपुर्ण जीवन शैली या विषयावर सविस्तर चर्चा केली, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विषयाची प्रभावी मांडणी केली, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
भास्कर मोरे यांनी आजचा तरुण व व्यसनाधीनता व मानसिक आरोग्य हा विषय घेऊन तरुणांना जागृत केले. सुजाता शेरखाने यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यांनी विद्यार्थ्यांनी कृतिशील रहावे यासाठी मार्गदर्शन केले. आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह, पारनेर गृहपाल अशोक काळे सरांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.