आद्य नाटककार, कर्ते समाजसुधारक, समतेचे खरे पाईक, कुळवाडी भूषण, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची समाधी शोधून पुण्यात 'शिव जयंतीची' सुरुवात करणारे, शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडा लिहिणारे..
मुलींसाठी, बहुजनासाठी पुण्यात प्रतिकुल परिस्थितीत विद्यादानाचे पवित्र कार्य करतांना भरल्या संसारातून सावित्रीसह घराबाहेर पडलेले.. स्त्रियांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम 'या' पितामहांनी केले. अखंड स्त्रीजातीने यांचे ऋणी रहायला हवं.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारे.. आपल्या वाड्यातील विहीर अस्पृश्यांना खुली करून समता अंगीकारणारे.. आपल्या घराच्या दारावर येथे कुमारी माता, विधवा, यांची बाळांतपणे मोफत केली जातील, असा फलक लावून सावित्रीच्या मदतीनं दायित्व करून अनेक माता -बालकांना जीवदान देणारे..
विधवा केशवपन चालीविरुद्ध पुण्यासारख्या शहाण्या शहरात जगातील पहिला न्हाव्यांचा संप घडवून ती अघोरी चाल बंद करणारे. 'देव' या शब्दाला 'निर्मिक' हा पर्यायी शब्द देऊन परंपरागत 'धर्म' संकल्पनेविरुद्ध विद्रोह करून 'सत्यशोधक समाज' स्थापित करून परिवर्तनाचा ध्वज फडकविणारे..
अपत्यप्राप्तीसाठी दुसरी भार्या करून घेण्याचा सल्ला सावित्रीने देताच उलट तूच दुसरा भ्रतार करून घेऊन जन्माला घातलेल्या बाळाचा मी सांभाळ करेन, असे म्हणत पुरुषप्रधान संस्कृतीला हादरा देऊन महिलांना गौरवणारे..
शेवटी आपल्या बालसंगोपन केंद्रात ब्राम्हण विधवा काशीबाईच्या पोटी जन्मलेल्या मुलाला दत्तक घेऊन यशवंत केले, डॉक्टर बनविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरूस्थानी मानलेले विद्रोही, मानवतावादी, सत्यशोधक, कवी, लेखक, नाटककार परिवर्तनवादी विचारवंत..
क्रांतिबा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचार व कार्यास विनम्र अभिवादन ! प्रत्येक घरात जोतिबा घडायला हवेत, तर समाज खऱ्या अर्थाने समतेकडे पाऊल टाकेल.
पितामह जोतीबा तुम्ही लढला, म्हणून आम्ही घडलो. आज पितामहांची जयंती. खरतर असे लोकोत्तर पुरुष जीवनमृत्यूला हरवलेले लोक असतात. म्हणून ही माणसं विचारातून आपल्यासोबत सतत असतात.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)