नाशिक - सध्या महाराष्ट्रात घोडदौड सुरु असलेल्या 'युनिक ब्रेन अकॅडमी'चा झेंडा अटकेपार नेऊन देशस्तरावर मोठ्या दिमाखात फडकवला आहे. ही कर्तबगारी युनिक कुटुंबातील शिलेदारांनी (विद्यार्थ्यांनी) नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये बक्षिसांची लयलूट करत पार पाडली.
(संपूर्ण व्हिडिओ पहा आणि
आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा)
या चमकणाऱ्या ताऱ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या दिमाखात नुकताच नाशिक येथे पार पडल्याची माहिती युनिक ब्रेन अकॅडमीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आशा अनपट यांनी दिली.
सुतार सभागृहात राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भव्यदिव्य पारितोषिक वितरण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक किशोर माने होते.
प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सहायक संचालक संतोष तोडकर, केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक विजेते पोलिस कर्मचारी गणेश देशमुख व प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब कुरुंद उपस्थित होते. तसेच युनिक अकॅडमीचे मार्गदर्शक सुरेश अनपट व कुसुम अनपट हे व्यासपीठावर होते.
नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये विविध लेव्हलवर युनिक अकॅडमीच्या तब्बल दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्या ट्रॉफीससह गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉन्झ मेडलवर आपली नाव कोरत आपल्या अकॅडमीचे नाव देशस्तरावर झळकावले.
'सायकल'वीर मानकरी - मयुरेश लोंढे या विद्यार्थ्याने अबॅकस फर्स्ट लेव्हल गटात १०० पैकी १०० गुण मिळवत प्रथम स्थान पटकावत प्रथम ट्रॉफीवर आपले नाव कोरण्याबरोबरच 'लकी ड्रॉ'द्वारे मानाची सायकल पटकावली.
ट्रॉफीवीर शिलेदार - ज्युनिअर लेव्हल मध्ये स्वराज प्रदीप ठाकरे, आराध्या अमित पाटील व अथर्व राजेंद्र कदम, फर्स्ट लेव्हलमध्ये मयुरेश राजेंद्र लोंढे, युगेंद्र नंदकुमार सदगीर व अथर्व संदीप काळे, सेकण्ड लेव्हलमध्ये नेहा शैलेश शर्मा, अनया नंदकुमार सदगीर व यशवीर श्रीराम पाटील यांनी प्रथम तीन विजेत्या ट्रॉफीवर आपली नावे कोरली.
बक्षिसांची लयलूट - नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन मध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रथम विजेत्या विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ काढून त्यांना सायकल हे बक्षीस देण्यात आली. तसेच प्रथम तीन स्थान पटकावणाऱ्याना ट्रॉफीसह, स्पेशल गिफ्टस आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय सहभागी विद्यार्थ्यांमधून ग्रँड मास्टर किताब पटकवणाऱ्याना गोल्ड मेडल व प्रशस्तिपत्रक, चॅम्पियन धारकांना सिल्वर मेडल आणि प्रशस्तीपत्रक आणि टॉपर रँक मिळणार्यांना ब्रॉन्झ मेडल आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.
संतोष तोडकर म्हणाले, विद्यार्थी दशा ही आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा स्तर आहे. या कालावधीतच आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने योग्य आकार प्राप्त होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास ही आपली आद्य जबाबदारी कुठलीही तडजोड न करता प्रामाणिकपणे पार पाडत आपल्या जीवनाचे सोने करावे.
एका गोष्टीच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील आपबिती विद्यार्थ्यांसमोर मांडताना बालकामगार ते केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक विजेता हा प्रवास गणेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. आपल्या आयुष्यात आज अनेक आव्हाने आहेत. विद्यार्थ्यांनी न डगमगता आयुष्यातील आव्हानांना समर्थपणे तोंड देत आपल्या यशाकडील वाट खंबीरपणे चालायला हवी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य आणखी वाढवले.
आपल्या आजूबाजूला समाजातील वातावरण खूप बरं नाही. त्यामुळे देशाचे भवि्तव्यरूपी भावी पिढी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात प्रामाणिकपणाची कास धरणं क्रमप्राप्त आहे, असे भाऊसाहेब कुरुंद म्हणाले.
विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती अंगीकारायला हवी. रोज सायकलिंग केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान आपल्याला लाभते. शारीरिक व्यायामाबरोबरच 'ब्रेन'च्या समृद्धीसाठीची युनिक ब्रेन रुपी जीम विद्यार्थ्यांना अतिशय गरजेची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीवनप्रवास खऱ्या अर्थाने सुखकर आणि समृद्ध होण्यास मदत होईल, असे अध्यक्षीय मार्गदर्शनात किशोर माने म्हणाले.
आयुष्यातील संकटावर मात करत घर आणि युनिक ब्रेन अकॅडमीची जबाबदारी खंबीरपणे सांभाळत महाराष्ट्रासह देशात अकॅडमीची यशस्वी घोडदौड करणाऱ्या डायरेक्टर आशा अनपट यांचा विशेष गुणगौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर माने, तसेच त्यांचे मार्गदर्शक सासरे सुरेश अनपट व सासूबाई कुसुम अनपट यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अकॅडमीचे यशस्वीपणे मॅनेजमेंट करताना तेव्हढ्याच जबाबदारीने आणि खडतरपणे घर संसाराचा गाडा सांभाळण्याची तारेवरची कसरत त्या कशा लिलया पेलतात याचा लेखाजोखा घेण्यात आला. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांची दाद देत जल्लोषात आशा अनपट यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची पावतीच दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॅनेजिंग डायरेक्टर ऍड. उमेश अनपट यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा, यासाठी गणेश अनपट, सिद्धी अनपट, यशांजली अनपट, स्वरांजली अनपट, दिव्यांजली अनपट, आदी प्रयत्नशील होते.