कधीकधी वाटतं प्रत्येक स्त्री सीता असते. तिची जगण्याची लालसा, इच्छा अनेक रेखांच्या मर्यादेत थांबत असेल का ? या रेखांना पार केले की रावण आड येईल की क्रांती दिसेल ?
रामायणात सीतेची जन्मकथा सांगितली आहे.. राज्यात मोठ्ठा दुष्काळ पडलाय म्हणून राजा जनक स्वतः नांगर घेऊन जमिनीला उपजाऊ करण्यासाठी जमीन नांगरतात. तो दिवस असतो वैशाखशुध्द नवमीचा. नांगरत असताना सोन्याचा फाळ एका जागी अडखळतो. बैल बुजून थांबतात.
मोठा दगड असेल म्हणून जिथे नांगराची रेष पडली होती, तिथे जमीन खणतात. त्यात एका सुबक लाकडी पेटीत ही भूमिकन्या सापडते. मिथिलानरेश आपले कुलगुरु महर्षी गौतम आणि अहिल्यापुत्र श्री. शतानंद यांना विचारल्यावर ते सांगतात. ही भूमिकन्या जमीन नांगरत असताना आपल्याला सापडली म्हणून हिचे नाव सीता.
नांगरताना नांगराच्या फाळाने जमिनीवर जी रेष उमटते त्या रेषेस मैथिली भाषेत सीता म्हणतात. जमिनीवरची साधी रेष.. रेखा काय ती. तिचं पूर्ण आयुष्य ह्या रेघेच्या मर्यादेने गुंतल होतं. सीता त्या रेषेचे नांव घेऊन जगली, वाढली, अन शेवटीही पृथ्वीच्या पोटातील एका रेषेतच विसावली. भूमिकन्या भूमितच विसावली.
हजारो पिढ्या या मर्यादेच्या रेषा पाळता पाळता जगण विसरुन जातात.. गेल्या आहेत.. याचा विचार साधा उल्लेखही करावासा कुणाला वाटत नाही. सीतेने भूतदयेसाठी रेषा ओलांडली म्हणूनच रामायण घडलं, असं म्हणतात.. म्हणजे मर्यादा नियम हे सारं तिनच सांभाळायचं.
मला वाटतं प्रत्येक स्त्री कुठंतरी त्या रेखांच्या चौकटी सांभाळत जगत असते. सीतेला चौदा वर्ष वनवास. त्यानंतर काहीही कारण नसताना अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं. शेवटी तिच्या सहनशिलतेची परिसीमा होते अन ती भूमिकन्या आपला आत्मसन्मान राखण्यासाठी भूमिला स्वाधीन होते.
हा स्त्रीचा शेवट. तिने आता मौन सोडायला हवं. सीतेने एकदा तरी का हा प्रश्न विचारायला हवा होता असं राहून राहून वाटत रहातं ? अनेक प्रश्न मनात ठेवून कितीतरी सीता अग्निला स्वाहा होतात. ओढणी तर तर हृयासाठीच आहे की काय असं वाटतं.
प्रत्येक सीतेला लवकर आत्मभान यावं आणि या क्षितिजापलीकडेही साऱ्या रेषा ओलांडून जाण्याचं सामर्थ्य तिला लाभेल, असा समतेचा रस्ता तिच्यासाठी निर्माण व्हावा. बस्स सध्या इतकचं.!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
(सहज मनातले या लेखसंग्रहातून)