बाईपण भारी देवा ! समतेची चळवळ खरंच मागे पडतेय का.?


शनिवारचा चतुरंग म्हणजे वाचनाची मेजवानी असते. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटावरचा माधुरी दिक्षित यांचा लेख वाचल्यानंतर मला क्षणभर वाटलं, ही समतेची चळवळ खरचं मागे पडतेय का ? सणवार, कर्मकांड, यात पुन्हा स्त्रीला गुंतवण्यात पुरुषसत्ताक पध्दती किंवा समाज यशस्वी ठरतोय का ?

हल्ली मुलींनाही प्रत्येक सणांचे साजरीकरण (सेलिब्रेशन) मोहात पाडतंय का ? प्रत्येकजण आपल्या धर्माचा झेंडा हाती घेऊन उदो उदो करत आहे. कुठलाही धर्म किंवा जात वाईट नाहीच. पण साहिष्णुता शिकवणारा धर्म हिंदूचाच आहे नाही का ? 

इंग्रजांची राजनिती आताही अंमलात येतेय का ? 'भांडणे लावा, फूट पाडा, फायदा घ्या..', या साऱ्यात महापुरुषांना विनाकारण ओढलं जातंय.. आणि स्त्रीचा वापर होतोय.. बायांनो, 'बाई' म्हणून तुमचं बाईशी काही नातं आहे की नाही ? का पुरुषसत्ताकपध्दतीच्या वाहक म्हणून तुम्हीच स्त्रीयांविरुध्द गळे काढणार आहात..!

शेकडो वर्ष तिच्यावर झालेला अन्याय बघणार आहात की नाही ? आदरणीय विद्याताईंनी (विद्या बाळ यांनी) दिलेल्या दिशेने आपण कधी चालणार ? 'जीन्स घालणारी आई प्रेमळ नसते' आणि 'तिचा पदर', अशा फालतू संकल्पनांमध्ये आपण किती वर्ष गुंतून रहाणार आहोत ? 

या साऱ्या प्रश्नांनी जोपर्यंत 'स्त्री' आणि तिला समजून घेणारा 'पुरुष' अस्वस्थ होत नाहीत, तोपर्यंत समतेचं स्वप्न सत्यात उतरेल की नाही, असं वाटू लागलंय. कधी कधी मला कोणी टिंगलीच्या स्वरात 'स्त्रीमुक्तिवाली' म्हणतात. मी नम्रपणे सांगू इच्छिते की,

आम्हाला मुक्त व्हायचं नाहीच, फक्त समतेने, सर्वांनी स्नेहभावाने, रहावे.. तिचं आकाश तिला मिळावं, तिचा श्वास तिला घेता यायला हवा. घर दोघाचं असतं, ते दोघांनी सावरायचं असतं. यात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हक्क दोघांनाही बरोबरीने हवेत.

हल्ली मुली नोकरी करतात. कर्मकांड, सणवार, परंपरा, पध्दती या त्यांनी साग्रसंगीत कराव्यात. ह्या अपेक्षा त्यांच्याकडून करणं हे बरोबर होणार आहे का.? मागल्या पिढीतील स्त्रीयांनी स्वतःच्या इच्छांना मुरड घालत, करिअरचे शिवधनुष्य पेलवत, स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता पुरुषांच्या सेवेत, पुरुषांच्या आज्ञेत रहाणं मनाविरुध्द का होईना मूकपणे सहन केले.

आता कुठे फक्त दहा वर्षात मुली बोलायला लागल्या तर मुलींच्या अपेक्षा वाढल्या अशा हाकाट्या सुरु झाल्या. आधी मूकपणे कितीजणी जळल्या, विहीरी जवळ करत राहिल्या, कधी हुंड्यापायी त्यांची हत्यासुध्दा झाली. आता विरोध करणारे म्हणतील, मुलींनी त्यांच्या बाजूने असलेल्या कायद्याचा दुरुपयोग केला.

एकदम मान्य हो मंडळी, पण कौटुंबिक छळातून होणाऱ्या आत्महत्येच्या संख्या आपण पहाणार आहोत की नाही..! जगभरातील माझी स्त्री सुखी असावी, असं मी म्हणते तेव्हा पुरुष दुःखी असावा, असा माझा अट्टाहास नाहीच..

मित्रांनो मला वाटतं पुरुषांची वाढ लहानपणापासूनच पुरुष म्हणून होण्यापेक्षा 'माणूस' म्हणून होणं फार फार मोलाचं आहे. कारण आम्हालाही फक्त पुरुषसत्ताक पध्दती नको आहे. पण त्याबरोबरच स्त्रीसत्ताक पध्दतीही नकोच आहे.

देश जर संविधानावर चालत असेल तर घरातही लोकशाही रुजू व्हायला हवी ना...! घरातील आचारसंहिता  समता, स्वातंत्र्य, प्रेम या लोकशाहीच्या तत्वांना धरुन असायला हवी ना...! 

सततच्या हुकूमशाही पध्दतीत राहिल्याने महाविद्यालयीन जीवनात शांत, हसतमुख, लाजाळू असलेल्या मुलीचं रुपांतर एका चिडखोर कर्कश बाईमध्ये होतं. कारण हुकूमशाही पध्दतीत कुंटुंबातील घटकांना ना स्वातंत्र्य असते, ना तिथे समतेचा सुर्यप्रकाश असतो.

हे आपल्याला शिव, शंभू, फुले, शाहू, आंबेडकर या थोरामोठ्यांनी, आपल्या वडिलधाऱ्यांनी दिलेले विचार आहेत. स्त्री-पुरुष दोघांनीही एकमेकांना देव मानून आपलं माणूसपण हरवायचं नाहीच, तर एकमेकांचे माणूसपण जपत, एकमेकांचा आदर करत पुढे जायचे आहे.

कारण नुसत्या पुरुषांचे राज्य किंवा नुसत्या स्त्रीयांचे राज्य येऊन चालणार नाही. तर स्त्री-पुरुष एकमेंकाना पूरक आहेत, स्त्रीच्या अंर्तमयी असलेलं पुरुषत्व, पुरुषांच्या अंर्तमयी असलेली स्त्रीत्व हे जाणून घेण्याची गरज आज अधोरेखित झालीय..!

प्रत्येक माणूसपण जपणाऱ्या माणसाला माणसांच्या जगात रहायची इच्छा नक्कीच असेल. या माणसांच्या जगात प्रत्येक माणूस आनंदी आणि समाधानाने जगू शकू हे मात्र निश्चित.!

एक जाता जाता बायांनो विचार करा, एकमेकींचा मत्सर करु नका... आपल्या मनातील एकमेकीविषयीच्या 'भगिनी'भावाची ज्योत सतत अंर्तमयी जागती ठेवा बरं.. एवढीच मित्रमैत्रिणींकडून नम्र अपेक्षा..!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
संपादक - सखीसंपदा
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !