अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील एका शिक्षक दाम्पत्याने शिक्षण अन सामाजिक क्षेत्रात एक आदर्श प्रस्थापित केला आहे. दोघापैकी एकाचा पगार सामाजातील गरजू निराधार अनाथ वंचितांसाठी ते देत आहेत. आज समाजात रक्ताची नाती एकमेकांना मदत करताना दिसत नाहीत. अशा काळात मानवतेच्या भावनेतून वंचित घटकांसाठी आपला वेळ अन पैसा खर्च करत आहेत.
पोपटराव फुंदे व राज्यभर नावलौकिक असलेल्या मोहटादेवी देवस्थानच्या विश्वस्त अनुराधा केदार-फुंदे या शिक्षक दांपत्याने सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत आपल्या पगारातील सुमारे १५ लाख रुपये निराधार व गरजू लोकांसाठी खर्च केले आहेत. या शिक्षक दांपत्याचे काम शिक्षकांची समाजात प्रतिष्ठा वाढवणारे आहे.
'सेवाश्रय फाऊंडेशन' नावाने एक सामाजिक संस्था स्थापन करून हे दाम्पत्य आपल्या महिन्याच्या पगारातील ४० हजार रुपये विधायक कामांसाठी खर्च करतात. विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शिलाई मशिन, पिठाची गिरणी शेळी वाटप करत त्यांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करुन देत आहेत.
कोरोनाकाळात ५० हून अधिक मुलांचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी घेतले आहे. दोन मुलींचे कन्यादान करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. २०१४ पासून फुंदे दांपत्याने हे कार्य सुरु केले. दोघांचा वाढदिवस एकाच आठवड्यात येत असल्यामुळे त्यांनी हेच औचित्य साधत गेल्या ४ वर्षापासून सामाजिक बांधिलकी सप्ताह साजरा करत आहेत. आठवड्याचे ७ दिवस ७ गरजू कुटुंबियांना मदत करत आहेत.
पोपटराव फुंदे हे विनामोबदला किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना उपदेश ददेतात. मोहटादेवी येथे विश्वस्त म्हणून काम करताना प्रामाणिक,पारदर्शी अन काटकसरीच्या कारभारासाठी आग्रही असलेल्या अनुराधा केदार-फुंदे या सामान्य भक्ताप्रमाणे १०० रुपयांची पावती घेवूनच आपली कार गडावर नेतात. त्यांच्या या निरपेक्ष वृत्ती अन प्रामाणिकपणाच भाविकांसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
'आजोळ' आणि विधवा प्रकल्पास देणगी - अपघातात पती गमावलेल्या एका महिलेला आधार म्हणुन ७ हजार रुपयांचा तर ज्येष्ठ आणि निराधार लोकांसाठी काम करत असलेल्या राक्षसभुवन ता. शिरुर येथील कर्ण तांबे यांच्या 'आजोळ' या सामाजिक प्रकल्पाला ५ हजार रुपयांचा धनादेश देवून फुंदे दांपत्याने सामाजिक बांधिलकी सप्ताहास प्रारंभ केला होता.