स्त्री आधुनिक झाली. घरी, बाहेरची नवी नवी आव्हाने तिच्यासमोर उभी आहेत. ती स्वतःला सिध्द करु पहातेय, धडपडतेय पण ठामपणे उभी रहातेय. दिवस नवे आलेत, पण तिचे खच्चीकरण करण्याचा तोंडावळा बदलला आहे. त्यातूनही ती ठामपणे उभी रहातेय. आपल्या अधिकारांसाठी झगडणेही ती आता शिकली आहे.
फक्त स्त्रीयांनी संघटीत होऊन एकमेकींच्या सोबत उभे राहायची गरज या क्षणाला अधोरेखित झाली आहे. कारण प्रेम, वात्सल्य, स्नेह, ममता तिच्या ठायी ठायी आहे आणि स्त्रीला माणूस म्हणून समजून लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन एकमेंकाचा आदर सन्मान करता यायला हवा.
बाईचं घर काय, देशसुध्दा तिचा नसतो. का ? ज्या घराला ती घरपण देत असते, त्यासाठी आपलं आयुष्य खर्ची टाकते.. मायेनं, प्रेमानं घरपण द्यायचा प्रयत्न करते. ते तिचं नसतंच कधी..!
कित्येक दारावर तिच्या नावाची पाटीही नसते.. आणि पाटी असली तरी त्या घरात तिला किती अधिकार असतात...? हा प्रश्न कित्येकदा अनुत्तरीत रहातो. कित्येकदा त्या पाटीवरही ती नसते. तरी ते घर आपलं मानत रहाते.
ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, माणूस आहे, हेच समाज विसरतो. आता माहेरी तिला कायद्याने अधिकार दिलेही असतील.पण नाती जपायची म्हणून कित्येकदा गरज असूनही मुली माहेरचा हक्क सोडून देतात.
तिथं कधीतरी कुणीतरी बोलवावं म्हणून आतल्याआत कुढत, दुःख करत रहातात..! कितीतरी ठिकाणी 'आहे मनोहर' वाटत असतं तिथे 'तरी' येतोच...! 'मनोहर', 'राजसी' असलं तरी दुःख ते दुःखच ना...! त्यात गरीबांचं दुःख, श्रीमंताचे दुःख, अशी प्रतवारी थोडीच लावता येते...
अंह, तिच्या वेदना चिरंतन आहेत. अश्वत्थाम्याच्या जखमेसारख्या...! बाबा नसल्यावर माहेर तुटत जातं, बाईच दुसऱ्या बाईच्या (भावजयीच्या) आमंत्रणाची वाट पहाते... बाई बाईबद्दल इतकी कठोर असु शकते.? एखादीला सासरी प्रेमाची वाणवा असते. तिला भाऊभावजय प्रेमात असलेले आवडत नाहीत..
अहो घरचं काय देश सुध्दा बाईचा होऊ देत नाहीत लोकं.. त्यापेक्षा पुराणातील लोक बरे. सुबल देशाची (आताचा अफगाणिस्तान) राजकन्या गांधारी हस्तिनापूरची राणी होऊ शकते..! पण परदेशातील एका सुविद्य महिलेला उच्च पदावर लोक स्विकारत नाहीत..
याला कारण बाईचं सक्षमीकरण होत नाही याकडे कुणाचही लक्ष नाही.. घरात मुलीबरोबर मुलाला वाढवताना हे घर बहिणीचंही आहे, हे त्याच्या मनात रुजवायला हवंच..! कारण आता तरी तिला तिचं स्वतःचं घर हवंय..
लहानपणी परक्याचं धन, लग्नानंतर दुसऱ्या घरातून आलेली, परक्या घरची, आता तिला हे प्रश्न पडू न देणं, हे समाजाच्या हातात आहे. नाहीतर कित्येक वर्षापूर्वी 'अमृता प्रितम' उद्वेगानं म्हणाल्या होत्या की, 'बदन के सिवा स्त्री का कोई वतन नही होता'. आता असं होऊ नये... प्रत्येक चिमणीला तिचं तिचं हक्काचं घरटं मिळायला हवं.. आमेन...!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)