अहमदनगर - काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 'या' तरुण सळसळत्या उमद्या युवा नेतृत्वाने माजी मंत्री असलेल्या स्वतःच्या काकाविरुद्ध दंड थोपटले. अन एकहाती विजय संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता त्यांनी हातात शिवबंधन बांधत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावचे सरपंच साजन सदाअण्णा पाचपुते यांनी सोमवारी (दि. ४) सायंकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते भाजपाचे नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे सख्खे पुतणे आहेत.
बबनराव पाचपुते यांच्या यशस्वी राजकीय प्रवासात त्यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांचा मोलाचा वाटा होता. पण सदाअण्णा यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडल्याचे अनेकांना जाणवत होते.
सदाअण्णा यांच्या पश्चात त्यांचा मुलगा साजन काय भूमिका घेणार याकडे काष्टीचे लक्ष लागले होते. आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्या मुलाला राजकारणात आणले. मात्र, साजन यांना हे पटले नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या साजन यांनी प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांच्याविरोधात दंड थोपटले.
दोघा भावात सरळ लढत झाली. अन त्यामध्ये साजन पाचपुते यांनी बहुमताने विजय मिळवला, तसेच राजकारणात स्वतंत्रपणे प्रवेश केला. त्यानंतर साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकली.
गावचे सरपंच व बाजार समितीचे संचालक पदे असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते अद्याप कुठल्या पक्षात नव्हते. मध्यंतरी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून पाचपुते यांची मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली.
त्यानंतर साजन पाचपुते यांचा निर्णय ठरला, अन सोमवारी सायंकाळी मुंबईत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. साजन पाचपुते यांच्यावर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.
साजन पाचपुते यांनी अल्पावधीतच चांगली प्रतिमा निर्माण करत जनमाणसांत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. आता त्यांना पक्षीय ताकदही मिळणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भुमिका मोलाची ठरणार आहे, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.