आज वसंत पंचमीचा दिवस.! माघ शुध्द पंचमीला वसंत पंचमी म्हणतात. वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायी होते. निसर्ग सोळा कलांनी फूलून बहरुन येतो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर भारतात व राजस्थानमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचा समन्वय भावमिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत ऋतू...! हा सरस्वतीचा जन्मदिन असतो. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पुजेसाठी ओळखली जात असे. मध्ययुगात या दिवशी 'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.
एक लोककथा सांगतात, सृष्टी निर्माण झाली तेव्हा वृक्ष, वेली, पशुपक्षी, मनुष्य निर्माण झाले. पण त्यांना वाणी अथवा आवाज नव्हता. मग वाग्देवी सरस्वतीने सर्वांना वाणी दिली. कदाचित ही कल्पित कथा असेल, पण प्रत्येकाला आवाज देताना सरस्वतीने कित्ती विचार केला असेल, असं सहजच मनात येऊन गेलं.
पुरुषाचा दमदार आवाज अर्थात विज्ञान याचे कारण सांगेलही... स्त्रीचा कोमल आवाज, चिमणीची चिवचिव, कोकीळेची कुहूकुहू, वाघाची डरकाळी, मांजराचे मिआंऊ, पानांची सळसळ, वाऱ्याचा आवाज.. कित्ती वेगवेगळे आवाज...
या आवाजाने या आवाजाच्या अस्तित्वाने जगाला जिवंतपणा आलेला आहे. आवाजाचं महत्व एकांतात कळतं. आपल्यासोबत असलेल्या, नसलेल्या प्रियजनांचे आवाज किती हवेहवेसे वाटतात.. म्हणून या शारदेला अभिवादन.
या वागेश्वरीला भगवती, शारदा, विणावादनी, वाग्देवी (वाणीची देवता) असे म्हणतात. संगिताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगिताची देवीही म्हणतात. वसंतपंचमीचा कृषी संस्कृतीशी सबंध आहे. यादिवशी नवान्न इष्टीचा यज्ञ करतात.
शेतात तयार झालेल्या नवीन पिकांच्या लोंब्यांची पूजा करतात. याच दिवशी लक्ष्मीचा जन्मदिवस, म्हणून या तिथीला 'श्रीपंचमी' म्हणतात. सरस्वतीचा जन्म दिवस म्हणून 'ज्ञानपंचमी' म्हणतात. म्हणून या दोन्ही देवता आयुष्यात आवश्यक आहेत.
अर्थात सरस्वतीला प्रसन्न केले तरच लक्ष्मी आपोआपच आपल्या आयुष्यात येते हे सतत लक्षात ठेवायला हवे. यादिवशी कामदेवाचा तथा मदनाचा जन्म झाला, असेही मानतात. म्हणून लोक दांपत्य जीवन सुखी जावे म्हणून रतिमदनाची पूजा करतात.
रतिमदनाचे प्रेमजीवन वाट्याला यावे, असं वाटत असेल तर प्रेमासाठी त्याग करायची तयारीही हवी. समजून घेणे, परस्परांचा सन्मान करणे, या दांपत्यजीवनाचा पाया असतो. पत्नीला तुच्छ मानून तिची टिंगलटवाळी करणारे लोक पत्नीच्या मनात कधीच आदर निर्माण करु शकत नाहीत...!
पुराणकथा खऱ्या खोट्या या वादात जायचं नाहीच. पण या लोककथा आपल्याला निसर्गाविषयी सकारात्मक आणि कृतज्ञताभाव शिकवतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रेमभाव हवा..
पैसे देऊन ज्ञान मिळतं, पण ज्ञानातला आत्मा खऱ्या शिक्षकाच्या प्रेमातूनच झिरपत शिष्यापर्यंत पोहचत असतो.
सर्वांना निसर्गात फुललेल्या आनंददायी वसंतपंचमीच्या शुभेच्छा. हा वसंत साऱ्यांच्या जीवनात सतत फुलत राहो या सदिच्छेसह..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)