तु जोतिबा झालास तरच..


सावित्री घरीच आहे..
अर्थात तु जोतिबा झालास तरच..! 
देवी बनवू नका रे..
फार सोपी गोष्ट आहे ती !

ती हृदयापासून चालते,
तु फक्त व्यवहार पाहू नको,
तिला टिंगलीचा विषय
बनवू नकोस..
ती सावित्रीच आहे.
अर्थात
तु जोतिबा झालास तरच...!

साऱ्यांचाच त्याग करत
ती तुझ्या घरात येते
आवडिनिवडींना मुरड घालत,
आयुष्याचा मुरडीचा
कानवला करते...
समजेल तुला.
अर्थात तू
तु जोतिबा झालास तरच...!

कधीकधी तिचे आईबाप
तुझ्या अर्थकारणात
सुरक्षितता शोधतात,
मग ते लोभी ठरतात,
तु तिचा बाप हो...
बघ समजेल तुला.
अर्थात
तु जोतिबा झालास तरच ! 

तिच्या शरीराच्या पलिकडे 
तिच्याजवळ आहे एक मन
जाणून घ्यावं रे तिचं माणूसपण..
विचार कर पुरुषी परिघापलिकडे
अर्थात
तु जोतिबा झालास तरच..! 

संसार दोघांचा असतो,
एकाने पसरला तर
दोघांनीही समेटायचा असतो.
बघ विचार करशील
अर्थात 
तु जोतिबा झालास तरच !

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !