पाथर्डी (अहमदनगर) - श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानात वासंतीक नवरात्रोत्सवाला पारंपारिक पद्धतीने उत्साहात प्रारंभ झाला. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश निरंजन नाईकवाडे व संगीता नाईकवाडे यांच्या हस्ते प्रमुख धार्मिक विधी संपन्न झाले.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी नगरचे भाविक राजेंद्र सानप यांनी गाभाऱ्यामध्ये हापूस आंब्याची सजावट देवीची सेवा म्हणून केली. येत्या रामनवमीच्या दिवशी उत्सवाची होम हवनाने सांगता होणार आहे. देवस्थानात वासंतीक, शारदीय व शाकंभरी असे नवरात्र साजरे होतात. प्रत्येक नवरात्राला वेगळे महत्त्व आहे.
वासंतीक नवरात्रोत्सवामध्ये संपूर्ण सृष्टी नवचैतन्याने नटून वृक्षवेली, नवपालवीने भाविकांना सकारात्मक जगण्याची प्रेरणा देतात वाईट विचार व नकारात्मक भाव पानगळतीप्रमाणे त्यागून नवनिर्माणाच्या हेतूने सृष्टीमध्ये झालेला बदल मातृ शक्तीचा उत्कट अविष्कार मानून तिचे पूजन करण्याचा संदेश देण्यात येतो.
देवीची विविध रुपांमध्ये होणारी पूजा सृष्टीच्या कल्याणाची कामना करणारी ठरते. अष्ट भैरव, चौसष्ठ योगिनी व दशमहाविद्यांचे स्थान येथे असल्याने येथील धार्मिक विधीला विशेष महत्त्व आहे.
माहूरच्या रेणुका मातेचे अंशात्मक रूप स्वयंभू स्वरूपात प्रकट झाल्याने माहूरच्या प्रथेप्रमाणे येथील उत्सव व धार्मिक विधी संपन्न होतात. आज सकाळी अभिषेक, पूजा, शांतीपाठ, पुण्याहवाचन होऊन सप्तशती पाठाला प्रारंभ झाला.
संबळ वाद्याच्या गजरात देवीच्या जयघोषात संपूर्ण वातावरण नवरात्रमय झाले. देवस्थान समितीच्या वतीने दररोज भाविकांना महाप्रसाद दिला जातो. सध्या तीव्र पाणीटंचाई असल्याने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची विशेष सुविधा पुरविण्यात आली आहे.
विश्वस्त ऍड. विक्रम वाडेकर, भीमराव खाडे, संदीप घुले आदींसह देवस्थान समितीचे अधिकारी, सर्व कर्मचारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व धार्मिक विधीचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न भूषण साकरे, भास्कर देशपांडे, बाळासाहेब क्षिरसागर आदींनी केले.
येत्या रामनवमीच्या दिवशी राम जन्मोत्सवा बरोबरच नवरात्रोत्सवाची सुद्धा सांगता होईल. नवरात्र काळात राज्याच्या विविध भागातून भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मायंबा येथे चैतन्य मच्छिंद्रनाथ व मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रा उत्सवानिमित्त संजीवन समाधीवर पुष्पहार व महावस्त्र देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष निरंजन नाईकवाडे, विश्वस्त विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी व ऍड. विक्रम वाडेकर यांनी भेट देऊन अर्पण केले.