काल स्वलिखितवर फोटो टास्कवर साऱ्या मुली खूपच विवेकी आणि जाणतेपणाने व्यक्त झाल्या आहेत. आता महालयात कावळ्याला पंच पक्वान्नांचे पानं ठेवायचे, कोल्हापूरच्या ओढ्यावरील रेणुका मंदिर, त्र्यंबोली मंदिरात जे नैवेद्याचे खच पायदळी तुडवून लोक खेचाखेची करत असतात तेव्हा मन विषण्ण होते.
देश विषमतेच्या टोकावर उभा आहे. एक वर्ग त्याला कुणाच्या दुःखांचे सोयरसुतक नाहीय.. एक वर्ग 'आपण बरं, आपलं घर बरं' या पठडीतले... आणि एक वर्ग 'आज कमावलं, तरच आजचं पोट भरेल' असा.
या शेवटच्या वर्गाला ना 'धर्म' आहे ना 'जात', याला फक्त पोटाची भूक आहे. देवधर्म, कर्मकांड यांच्याविषयी त्यांना काहीच माहित नाही. भाकरी म्हणजे देव. मुलाबाळांची भूक भागविणे म्हणजे धर्म.. हेच त्यांना माहित आहे.
आता पूर्णब्रम्ह म्हणजे काय ? तर हिंदू तत्वज्ञानानुसार संपूर्ण विश्वाची निर्मिती ब्रम्हातून झालीय. ब्रम्ह म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला अंतिम पातळीवर महत्व द्यायचे असेल तर त्या पूर्णब्रम्ह.
जेवढे आपल्या आयुष्यात या सर्वोच्च ताकदीला जेवढं महत्व आहे, तेवढच महत्व आपल्या अन्नाला आहे. म्हणजे हे पूर्णब्रम्ह असणारे अन्न असे नदी, कावळे यांना घालून तुम्ही साक्षात ब्रम्हाचाच अपमान करत आहात की.
साक्षात अन्नाच्या रुपात असलेल्या या सुप्रिमोला असं चिखलात फेकताहेत. मंदिरात दिल्या जाणाऱ्या नैवद्याला पायदळी तुडवून त्याचा चिखल होताना मी रेणुका मंदिरात पाहिला आहे. श्रध्देचे हे रुप मला नेहमीच उद्विग्न करते.
श्रध्दा म्हणजे काय.? श्रीकृष्णाने सुदाम्याविषयी ठेवली ती श्रध्दा. एकनाथांनी तडफडणाऱ्या प्राण्याच्या मुखात जल दिल ती श्रध्दा. शिवबांनी मावळ्यांना लेकरु मानून दिलेलं प्रेम ही श्रध्दा. शंभूराजे स्वराज्यासाठी दिलेलं बलीदान ही श्रध्दा.
येसूबाईंचा त्याग ही देशावरची श्रध्दा. ताराऊंचा लढा ही देशासाठीची श्रध्दा. किती ठिकाणी दिसते ही श्रध्दा. मातीमोल होणारं हे अन्न पिकवताना त्या बळीराजाला किती कष्ट होतात, हे तुम्हाआम्हाला चार भिंतीत राहून कसं कळेल..?
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)